नागपूरच्या जरीपटक्यातील प्लास्टिक कंपनीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 10:49 PM2018-07-19T22:49:48+5:302018-07-19T22:51:19+5:30

जरीपटक्यातील कृषी मित्र प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. कंपनीत लागलेल्या आगीने बाजूचे गॅरेजही कवेत घेतले. त्यामुळे गॅरेज मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही भीषण आग लागली.

A fire in a plastic company in Nagpur Jaripatka | नागपूरच्या जरीपटक्यातील प्लास्टिक कंपनीला आग

नागपूरच्या जरीपटक्यातील प्लास्टिक कंपनीला आग

Next
ठळक मुद्देआगीने बाजूचे गॅरेजही घेतले कवेत : लाखोंचे नुकसान


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील कृषी मित्र प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. कंपनीत लागलेल्या आगीने बाजूचे गॅरेजही कवेत घेतले. त्यामुळे गॅरेज मालकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ही भीषण आग लागली.
जरीपटक्यात कामठी मार्गावरील रेल्वे पुलाजवळ (२ नंबर नाक्याजवळ) कृषी मित्र प्लास्टिक कंपनी आहे. तेथे विविधोपयोगी प्लास्टिक साहित्य, उपकरणांची निर्मिती होते. गुरुवारी सकाळी ७.३० च्या सुमारास कंपनीतून धुराचे लोट निघताना दिसल्याने तेथील चौकीदारांनी जरीपटका पोलीस तसेच अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. पोलिसांसह अग्निशमन दलाचा ताफाही लगेच तेथे पोहचला. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. कंपनीत सर्व ज्वलनशील साहित्य आणि पदार्थ असल्यामुळे कंपनीचा बराचसा भाग आगीने आपल्या कवेत घेतला. एवढेच नव्हे तर बाजूच्या एका गॅरेजलाही आगीने वेढले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येत नागरिक तेथे गोळा झाले. आगीचे रौद्र रूप बघता अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहचले. तब्बल नऊ बंबाच्या साह्याने आग विझविण्याचे प्रयत्न झाले. पाच तासानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश मिळवले. वृत्त लिहिस्तोवर आगीमुळे कंपनी आणि गॅरेज मालकाचे नेमके किती नुकसान झाले, ते स्पष्ट झाले नव्हते. आगीचे कारणही स्पष्ट झाले नव्हते. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज असल्याचे अग्निशमन अधिकारी सुधाकर रामगुनीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

जवान किरकोळ जखमी
सकाळची वेळ असल्यामुळे कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे सुदैवाने आगीमुळे कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, आग विझविण्याच्या प्रयत्नात कर्तव्यावर असलेला अग्निशमन दलाचा जवान अकलीम शेख याला आगीचे चटके बसून दुखापत झाली. त्याला लगेच रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: A fire in a plastic company in Nagpur Jaripatka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.