पारशिवनी येथील पाॅलिमर कंपनीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:08 AM2021-05-30T04:08:39+5:302021-05-30T04:08:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : शहरालगत असलेल्या औद्याेगिक वसाहतीतील गाैतम पाॅलिमर नामक कंपनीला शुक्रवारी (दि. २८) मध्यरात्री २ ते ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : शहरालगत असलेल्या औद्याेगिक वसाहतीतील गाैतम पाॅलिमर नामक कंपनीला शुक्रवारी (दि. २८) मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीवर शनिवारी (दि. २९) सकाळी नियंत्रण मिळविण्यात आले. ताेपर्यंत कंपनीतील संपूर्ण यंत्रसामग्री आणि पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थळी पडल्याने किमान १ काेटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली.
गाैतम पाॅलिमर नामक कंपनीत प्लास्टिकची पाेती कच्चा माल म्हणून वापरला जात असून, त्यापासून प्लास्टिकचे एक ते सव्वा फूट जाडी व उंचीचे ठाेकळे तयार केले जातात. त्या ठाेकळ्यांना दाणा असे संबोधले जात असून, त्याचा प्लास्टिकच्या इतर वस्तू तयार करण्यासाठी वापर केला जाताे. लाॅकडाऊनमुळे वर्षभरापासून ही कंपनी बंद असल्याने कंपनीत केवळ पक्का माल व यंत्रसामग्री हाेती. त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी एका सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली आहे. ताे सुपरवायझर राेज सायंकाळी घरी निघून जाताे.
मध्यरात्री २ ते २.३० वाजताच्या दरम्यान या कंपनीच्या इमारतीतून माेठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे शेजारच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या व पारशिवनी शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच सुपरवायझरसह पारशिवनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांच्या सूचनेवरून खापा (ता. सावनेर) नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान वाहनासह पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करीत सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले. ताेपर्यंत आतील यंत्रसामग्री व पक्का माल पूर्णपणे जळाला. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
...
१५० टन पक्का माल
या आगीत ८० लाख रुपये किमतीचा १५० टन पक्का माल, ४५ ते ५० लाख रुपये किमतीच्या मशीन व ३० लाख रुपये किमतीचे शेड जळाल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली. आग विझल्यानंतर पारशिवनी पाेलिसांनी पंचनामाही केला. दुपारच्या सुमारास बँक व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट दिल्याची माहिती सुपरवायझरने दिली. प्लास्टिकला लागलेली आग लवकर विझत नसल्याने परिसरात सर्वत्र धूर पसरला हाेता.