रेल्वे गाड्यांमध्ये अग्नी सुरक्षा अभियान! मदुराईतील घटनेपासून धडा
By नरेश डोंगरे | Published: August 28, 2023 07:23 PM2023-08-28T19:23:23+5:302023-08-28T19:24:05+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, आरपीएफकडून प्रवाशांचे समुपदेशन
नागपूर : तामिळनाडूत रेल्वे गाडीच्या डब्यात सिलिंडरमुळे झालेल्या भीषण स्फोटापासून धडा घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपूर विभागात रेल्वे गाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष अग्नी सुरक्षा अभियान सुरू केले आहे.
गॅस सिलिंडर किंवा कोणत्याच प्रकारचे दुसरे ज्वलनशील पदार्थ अथवा साहित्य रेल्वेत नेऊ नये, असे नेहमी रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जाते. रेल्वे गाड्यांतील डब्यातही तसे ठळकपणे लिहून असते. मात्र, अनेक प्रवासी त्याकडे लक्षच देत नाहीत. ते बिनधास्त असे पदार्थ, साहित्य घेऊन प्रवास करतात.
तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावरून लखनऊला जाणाऱ्या एका रेल्वे गाडीच्या डब्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत होरपळून १० प्रवासी ठार झाले. शनिवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह प्रवाशांमध्येही आगीचा 'ज्वलंत' प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. एकीकडे प्रवाशांना लेखी स्वरूपाच्या सूचना दिल्यावर रेल्वे अधिकारी समाधान मानतात. दुसरे कोणतेही प्रभावी प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत नाही. त्याचमुळे मदुराईची घटना घडल्याचे चर्चेला आले आहे. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (दपूम) रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) विभागीय आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी नागपूर विभागात प्रभावी अग्नि सुरक्षा अभियान चालविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, रविवारपासून आरपीएफच्या जवानांनी विविध रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर जनजगारण अभियान सुरू केले आहे. त्यानुसार, रेल्वे प्रवाशांना प्रवासात ज्वलनशिल पदार्थ अथवा साहित्य सोबत नेल्यास कसा धोका होऊ शकतो. ते किती घातक आहे, या संबंधाने आरपीएफच्या जवानांकडून माहिती दिली जात आहे.
... तर, कारवाई होऊ शकते
ज्वलनशिल पदार्थ आणि प्रतिबंधित सामान सोबत नेऊ नका आणि दुसऱ्यांनाही सोबत नेण्यास मनाई करा. कुणी तसे करीत असेल तर आरपीएफ किंवा रेल्वे पोलिसांना माहिती द्या. कायद्यानुसार, तुम्ही ज्वलनशिल पदार्थ अथवा प्रतिबंधित सामान सोबत नेल्यास तुमच्यावर कायदेशिर कारवाई होऊ शकते, असेही या अभियानच्या अनुषंगाने प्रवाशांना समजावून सांगितले जात आहे.