बियाण्यांच्या गोदामाला आग
By admin | Published: May 5, 2017 02:52 AM2017-05-05T02:52:29+5:302017-05-05T02:52:29+5:30
नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरीलगतच्या वडधामना शिवारातील बियाण्यांच्या गोदामाला आग लागली.
अंदाजे तीन कोटींचे नुकसान :
वडधामना शिवारातील घटना
धामणा : नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरीलगतच्या वडधामना शिवारातील बियाण्यांच्या गोदामाला आग लागली. त्यात बहुतांश बियाणे जळाल्याने अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.
वडधामना शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ लगत जानकी सीडस् कंपनीचे गोदाम आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, धान, उडीद या धान्यासह भाजीपाल्याच्या बियाण्यांची पोती ठेवण्यात आली होती.
बुधवारी रात्री या परिसरात अचानक वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गोदामात शॉर्टसर्किट झाले आणि आतील बियाण्याने हळूहळू पेट घेण्यास सुरुवात केली. ही आग मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत धुमसत होती. पहाटेच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाल्याने ही बाब जवळच राहणाऱ्या काही हमालांच्या निदर्शनास आली. हमालांनी लगेच कंपनीचे संचालक अनिल घुमारे यांना माहिती दिली.
माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत आतील धानाचे पाच हजार क्विंटल, सोयाबीनचे चार हजार क्विंटल, उडिदाचे दोन हजार क्विंटल आणि विविध भाजीपाल्याचे आठ हजार क्विंटल बियाणे आगाच्या भक्ष्यस्थानी पडले. यात तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती कंपनीचे संचालक अनिल घुमारे यांनी दिली.
सदर गोदाम रमेश चावला यांच्या मालकीचे असून, जानकी सीडस् कंपनीने ते मागील वर्षापासून किरायाने घेतले होते. या गोदामातून विदर्भात बियाण्यांचा पुरवठा केला जातो, अशी माहिती कंपनीचे संचालक संजय ठाकूर यांनी दिली. (वार्ताहर)