नागपूरच्या कळमना येथील झोपडपट्टीला आग : सात झोपड्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 07:51 PM2020-03-09T19:51:06+5:302020-03-09T19:55:46+5:30
कळमना भागातील डिप्टी सिग्नल आदिवासी प्रकाश नगर येथील झोपडपट्टीला सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना भागातील डिप्टी सिग्नल आदिवासी प्रकाश नगर येथील झोपडपट्टीला सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास लागलेल्या आगीत सात झोपड्या जळून खाक झाल्या. यात रोख रकमेसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच सकाळी ६ च्या सुमारास धरमपेठ येथील प्लास्टिक गोदामाला आग लागली. यात प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक विभागाच्या जवानांनी दोन्ही आगी नियंत्रणात आणल्या.
आदिवासी प्रकाशनगर झोपडपट्टीला आग लागण्याची माहिती मिळताच कळमना अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु आगीची भीषणता लक्षात घेता महापालिका मुख्यालय, सुगतनगर येथील सहा गाड्या पाठविण्यात आल्या. आगीत धर्मेंद्र लांजेवार, सत्यम गोपीप्रसाद, व्यंकेंद्र पत्की, लक्ष्मण दांडेकर, देवचंद युवनादी, नाज अब्दुल शेख व सतीश सहारे आदींच्या झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. झोपडपट्टीधारकांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत घरातील रोख रक्कम तसेच सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच कल्पना दाभने यांच्या घरातील कपडे व टीव्हीचे नुकसान झाले. आगीत संपूर्ण साहित्य जळाल्याने झोपडपट्टीधारकांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. परिसरात सर्वत्र जळालेल्या झोपड्यांची राख पसरली होती.
माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके , स्थानाधिकारी बी.पी. चंदनखेडे, राजेंद्र दुबे, सुनील डोकरे, मोहन गुडधे, सुनील राऊ त, केशव कोठे यांच्यासह अग्निशमन विभागाच्या जवानांनी धाव घेतली.
प्लास्टिक गोदामाला आग
धरमपेठ भागातील ट्राफिक चिल्ड्रेन पार्क लगतच्या गजानन मंदिरासमोरील जितेंद्र जैन यांच्या दोन मजली सचिन प्लास्टिक गोदामाला सकाळी ६ च्या सुमारास अचानक आग लागली. आगीत प्लास्टिक खूर्च्या, टेबल, एसी, मीटर, गॅस सिलिंडर यासाठी प्लास्टिकचे साहित्य नष्ट झाल्याने लाखो रुपयांचे नुसान झाले. प्लास्टिक साहित्यामुळे परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग नियंत्रणात आणली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.