नागपुरातील टीबी वॉर्ड परिसरात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:35 AM2018-05-20T01:35:26+5:302018-05-20T01:35:42+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेडिकल)अंतर्गत येणाऱ्या ‘टीबी’ वॉर्ड परिसरात शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ)जवानांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय(मेडिकल)अंतर्गत येणाऱ्या ‘टीबी’ वॉर्ड परिसरात शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ)जवानांनी वेळीच तत्परता दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली.
मेडिकलपासून काही अंतरावर असलेला टीबी वॉर्ड परिसर हा झाडेझुडपांनी वेढला आहे. या भागात विशेष सफाई होत नसल्याने अनेक भागात कचऱ्याचा ढीगही साचला आहे. याच परिसरात क्षयरोग व त्वचारोग विभागाचा वॉर्ड आहे तर जवळच कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने चांगलाच पेट घेतला. त्यावेळी या भागात कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान अंकुश खानझोडे व सहकारी कुळमेथे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला दोघांनीही झाडांच्या फांद्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग वाढतच चालली आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील दुर्घटना टळली. या घटनेकडे दुर्लक्ष केले असते तर आग क्षयरोग वॉर्डापर्यंत पोहचून मोठे नुकसान झाले असते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.