अग्निशमन अभ्यासक्रम बंधनकारक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:50 AM2017-11-20T01:50:46+5:302017-11-20T01:51:14+5:30
अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही.
ऑनलाईन लोकमत
नागपूर :अग्निशमन विभागात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवकांना आता राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र मुंबई येथील अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे बंधनकारक राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याच्या अटीला शिथिल करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर महापालिका व आपात्कालीन सेवा विभागात सेवा प्रवेशासाठी ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत योगे यांच्यातर्फे मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांना १७ नोव्हेंबर २०१७ रोजी यासंबंधीचे पत्र जारी केले आहे. यासोबतच संबंधित प्रकरणात सविस्तर रिपोर्ट मागितला आहे. मनपा आयुक्त अश्विन मुद्गल यांनी संबंधित पत्र अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांना पाठवून सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मनपात नवीन आकृतिबंधाने भर्ती प्रक्रियेत अडचणी येणार नाही.
नागपुरातील अग्निशमन विभागातील मंजूर सेवा प्रवेश नियमानुसार अग्निशमामक विमोचकाच्या रिक्त पदासाठी सरळ भर्ती प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. यासाठी पात्र उमेदवाराने राज्य प्रशिक्षण अग्निशमन केंद्र महाराष्ट्र मुंबईचा अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यासक्रमाची अट विदर्भातील युवकांसाठी नुकसानकारक होती. ती तातडीने रद्द करण्याची मागणी होत होती. अग्निशमन समितीचे सभापती अॅड. संजय बालपांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा मुद्दा उचलला. तसेच महापौर नंदा जिचकार यांनाही ही अट रद्द करण्याबाबत निवेदन दिले होते, हे विशेष.
बालपांडे यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे अग्निशमन सेवेत येण्यास इच्छुक असलेल्या विदर्भातील युवकांचा मोठा लाभ होणार आहे. ही अट रद्द झाली नसती तर जितके पद आहेत, त्यापेक्षाही कमी उमेदवारांनी अर्ज केला असता. यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्नरत होतो. अखेर यश मिळाले. उमेदवाराची नियुक्ती झाल्यानंतर अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट ठेवली जाऊ शकते.
कुठल्याही महिलेने अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाही
अग्निशामक विमोचकाच्या २५० जागा आहेत. पूर्वीची अट कायम राहिली तर ३० जागा सुद्धा भरल्या जाणार नाही. ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यांना सुद्धा हा अभ्यासक्रम उत्तीर्ण करण्याची अट आहे. आजवर कुठल्याही महिलेने हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला नाही.