रासेयोच्या मुलांना 'फायर फायटिंग'चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:57+5:302021-02-12T04:08:57+5:30
महापौर :मनपा एन.एस.एस.चे सहकार्य घेणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ...
महापौर :मनपा एन.एस.एस.चे सहकार्य घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) च्या सहकार्याने नागपुरातील विविध महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फायर फायटिंग"चे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक महाविद्यालयाचे किमान सात विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिल्यास प्रत्येक वर्षी दोन ते तीन हजार प्रशिक्षित मुले तयार होतील. ते आपत्ती काळात नागरिकांची, शहराची संपदा वाचविण्यात मदत करतील अशी माहिती महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी बैठकीत दिली.
यावेळी महापौर आणि राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्यासह उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त (उद्यान) अमोल चौरपगार, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, अग्निशमन विभागाचे उप मुख्य अधिकारी बी. पी. चंदनखेडे, स्थानाधिकारी (सिव्हील) आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणामुळे येणाऱ्या काळात शहराच्या विविध भागात ८ - १० हजार फायर फायटिंग प्रशिक्षित मुले तयार होतील. शहरात एखाद्या परिसरात अचानक आग लागली तर ही प्रशिक्षित मुले अग्निशमन दलाला मदत करतील. असे दयाशंकर तिवारी म्हणाले.
.....
पुतळे संवर्धनासाठी रासेयोचा पुढाकार
शहरात असलेल्या पुतळ्यांमुळे शहराचे सौंदर्य अधिकच वाढले आहे, त्यामुळे पुतळ्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शहरातील पुतळे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी मनपातर्फे मदतीची हमी देण्यात आली.
....