पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:57 AM2019-10-29T00:57:19+5:302019-10-29T01:00:19+5:30
ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी आली की साधारणत: गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. परंतु ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात १४.९ मिमी पावसाची नोंद झाली.
रविवारी दुपारपासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली होती. महिलावर्गाने अंगणात रांगोळ्या काढण्यासदेखील सुरुवात केली. मात्र बऱ्याच मेहनतीने तयार झालेल्या रांगोळ्यांच्या भोवताल दिवे लावण्याची संधीदेखील अनेकांना मिळाली नाही. सायंकाळी दिवेलागणीच्या वेळीच अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला व जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेकांनी घरावर लावलेल्या ‘लायटिंग’देखील यामुळे बंद पडल्या. पाऊस कमी झाल्यानंतर लोक घराबाहेर पडले व त्यानंतर आतषबाजी करण्यात आली. सोमवारी पहाटेदेखील पावसाने अर्धा तास हजेरी लावली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. यामुळे पाऊस येत आहे. मंगळवारीदेखील पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
‘सोशल मीडिया’वर दिवसाळा झाला ‘ट्रेन्डिंग’
दरम्यान, पावसाने ऐन दिवाळीत हजेरी लावल्यामुळे ‘सोशल मीडिया’वर हाच विषय चर्चेला होता. ‘पाऊस आता दिवाळीचा फराळ करूनच परत जाईल’, ‘हा पावसाळा नाही-हिवाळा नाही-तर दिवसाळा आहे’, ‘जा रे जा रे पावसा तुला देतो पैसा’, ‘छत्रीवाला आकाशदिवा कुठे मिळतो’ अशा आशयाचा ‘पोस्ट’ फिरत होत्या.