फटाक्यांची आतषबाजी ‘आऊट ऑफ कंट्रोल’, पोलिसांची बघ्याचीच भुमिका
By योगेश पांडे | Published: November 13, 2023 03:14 PM2023-11-13T15:14:23+5:302023-11-13T15:14:36+5:30
नियमांचा खुलेआम भंग, मध्यरात्रीनंतरदेखील फुटत होते फटाके : पोलीस आयुक्तांच्या निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता
नागपूर : वायू, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी नागपूर पोलीस व मनपातर्फे नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ८ ते रात्री १० वाजतापर्यंतची वेळ निर्धारित करण्यात आली होती. पोलिसांनी मनमर्जीने फटाके फोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारादेखील दिला होता. मात्र प्रत्यक्षात शहरात फटाक्यांची ‘आऊट ऑफ कंट्रोल’ आतषबाजी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलीस आयुक्तांच्या निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता लागत असताना पोलिसांनी मात्र बघ्याचीच भूमिका घेतली होती. तक्रार आली नसल्याचे कारण देत पोलिसांनी ठोस कारवाई करण्यासदेखील पुढाकार घेतला नाही. दरम्यान फटाक्यांमुळे ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अतिउत्साहाच्या भरात अनेक जण रात्रीदेखील फटाके फोडून इतरांच्या झोपा खराब करतात. त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासनाने रात्री ८ ते १० ही वेळ निर्धारित केली होती. ठराविक वेळेनंतर फटाके फोडणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटेपासून मोठे आवाज करणारे फटाके फुटण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळच्या सुमारास तर फटाके फोडण्याचे प्रमाण फार जास्त वाढले होते. सायंकाळी सहा वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. यात मोठे आवाज करणारे फटाकेदेखील होते. मध्यरात्रीनंतरदेखील भेंडे ले आऊट, प्रतापनगर, गिट्टीखदान, पोलीस लाईन टाकळी, लक्ष्मीनगर, इतवारी, महाल, वर्धमाननगर, शताब्दी चौक, बेलतरोडी मार्ग इत्यादी ठिकाणी फटाके फोडले जात होते. गस्तीवरील पथकाकडून कारवाई तर दूरच राहिली, फारसे कुणाला टोकण्यातदेखील आले नाही.
- पोलीस लाईन टाकळीतच फुटले प्रमाणाबाहेर फटाके
पोलीस लाईन टाकळी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी राहतात. मात्र तेथेदेखील वेळमर्यादेचा भंग करत मोठे आवाज करणारे फटाके फोडण्याची स्पर्धाच लागली होती. पोलीस आयुक्तांकडून केवळ कागदावरच आदेश जारी होतात व कागदावरच त्याची अंमलबजावणी होते का असा सवाल जनसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत होता.
- सायलेन्स झोन नावापुरतेच
शहरातील अनेक इस्पितळांच्या परिसरातदेखील नागरिकांनी फटाके फोडले. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदुषण झाले. त्याचा मन:स्ताप रुग्ण, त्यांचे नातेवाईक, वृद्ध नागरिक यांना सहन करावा लागला.
- ११ जखमी पोहोचले मेडिकलमध्ये
दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे जखमी होऊन ११ रुग्ण नागपुरातील मेडिकलमध्ये पोहोचले. त्यात ११ वर्षांखालील चार रुग्णांचा समावेश होता. काहींना फटाक्यांमुळे भाजून किरकोळ इजाही झाली होती. सगळ्यांवर उपचार करून बहुतांश रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. तर बऱ्याच खासगी रुग्णालयातही रुग्ण पोहोचले.