नागपूरनजीकच्या भंडारा मार्गावरील माथनी येथे दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:01 PM2017-12-19T22:01:46+5:302017-12-19T22:03:11+5:30

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवारच्या मध्यरात्री घडली.

Firing by dacoits on police party at Mothani on Bhandara road in Nagpur | नागपूरनजीकच्या भंडारा मार्गावरील माथनी येथे दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

नागपूरनजीकच्या भंडारा मार्गावरील माथनी येथे दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार

googlenewsNext
ठळक मुद्देनाकाबंदी दरम्यान घडला प्रकार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवारच्या मध्यरात्री घडली.
घटना अशी की, दरोडेखोरांनी सोमवारी रात्री तुमसर (जिल्हा भंडारा) येथील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, त्यांनी डीएल-३ सी/एएस-४९१३ क्रमांकाच्या कारने घटनास्थळाहून पळ काढला. हे दरोडेखोर भंडारा मार्गे नागपूरच्या दिशेने पळाले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे मौदा पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे मौदा ठाण्यातील रमेश येडे, किशोर नारायणे, हेमराज सोनवणे, दीपक पोटफोडे यांनी माथनी शिवारातील टोल नाक्यावर नाकाबंदी करून नागपूरच्या दिशेने जाणाºया वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी डीएल-३ सी/एएस-४९१३ क्रमांकाची कार थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातच चालकाने कार थांबवून थोडी मागे घेतली आणि कारमधील एकाने पोलीस कर्मचारी रमेश येडे यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने यात त्यांना दुखापत झाली नाही. कारमधील दुसऱ्याने किशोर नारायणे यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले होते. दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या धावपळीत आरोपींनी कार तिथेच सोडून पळ काढला. दरोडेखोर २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून, त्यांची संख्या कळू शकली नाही. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३०७, ३५३, ३४ व आर्म अ‍ॅक्ट सहकलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कार जप्त
जप्त कारची पोलिसांनी झडती घेतली असता कारमध्ये गॅस सिलिंडर, गॅस कटर, आॅक्सीजन सिलिंडर, दोन सब्बल, कपडे, बॅग आदी साहित्य आढळून आले. हे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मौदा पोलिसांनी दिली.

Web Title: Firing by dacoits on police party at Mothani on Bhandara road in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.