नागपूरच्या जरीपटक्यात टोळीयुद्धातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:03 PM2018-06-20T22:03:23+5:302018-06-20T22:03:38+5:30
ट्रेनमध्ये सक्रिय अवैध व्हेंडर यांच्यात सुरू असलेल्या टोळीयुद्धातून आरोपी योगेश भोयर याच्यावर गोळी झाडण्यात आली. जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रेनमध्ये सक्रिय अवैध व्हेंडर यांच्यात सुरू असलेल्या टोळीयुद्धातून आरोपी योगेश भोयर याच्यावर गोळी झाडण्यात आली. जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीच्या भावासह अन्य दोन आरोपी फरार आहेत. अटकेतील आरोपी पहलवान बाबा दरगाह, मोतीबाग येथील रहिवासी २२ वर्षीय आहे.
१९ जून रोजी रात्री गड्डीगोदामच्या पंजाबी लाईन येथे ३५ वर्षीय योगेश भोयर याच्यावर आरोपी शाहरुख व त्याचा लहान भाऊ मोटू व एक सहकारी मुक्का याने हल्ला केला होता. देशीकट्ट्यातून योगेशवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मुक्का तलवार व मोटू कट्टा घेऊन होता. मोटूने दोनवेळा कट्ट्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण कट्ट्यातून गोळी न चालल्याने मुक्का याने योगेशवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु योगेश तेथून पळून घरी निघून गेला. घराचा दरवाजा बंद केल्यामुळे आरोपी खाली हात परत गेले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. योगेश याच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. तो पंजाबी लाईन येथील महिषासूर झोपडपट्टी येथे राहतो. तो रेल्वेत अवैध व्हेंडरची टोळी चालवितो. त्याच्याकडे आठ ते दहा युवकांचा समूह आहे. हे युवक रेल्वेत चणा मसाला व अन्य खाद्यसामुग्रीची विक्री करतात. आरोपी मुक्का, मोटू व शाहरुखसुद्धा कुख्यात गुन्हेगार आहेत. ते सुद्धा पूर्वी रेल्वेत अवैध व्हेंडरची टोळी चालवीत होते. परंतु गेल्या काही दिवसात योगेशच्या टोळीचा रेल्वेमध्ये दबदबा वाढला होता. त्यामुळे आरोपींच्या टोळीचा कारभार कमी झाला होता.
त्यामुळे आरोपींनी रेल्वे ट्रॅकवर अवैध दारूचा अड्डा सुरू केला होता. आरोपींचा योगेशशी वाद सुरू होता. एकमेकांना धमकीसुद्धा देत होते. योगेशवर खुनाचे गुन्हे दाखल असल्याने आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती आरोपींना होती. त्यामुळे योगेशला संपविण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यातूनच योगेशवर गोळी झाडण्यात आली. परंतु दोनवेळा ट्रिगर दाबल्यानंतर बंदुकीतून गोळी सुटली नाही. त्यामुळे योगेशचा जीव वाचला. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून शाहरुख शेख याला अटक केली आहे.