तरुणीने सेल्फीस नकार दिल्याने नागपुरात गुंडाने केला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:11 PM2018-04-09T15:11:25+5:302018-04-09T15:11:37+5:30
एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून जबरदस्ती करणाऱ्या गुंडाला अडविणाऱ्या युवकावर त्याने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे १.४५ वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून जबरदस्ती करणाऱ्या गुंडाला अडविणाऱ्या युवकावर त्याने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे १.४५ वाजता घडली.
रविवारी रात्री येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या झिरो डिग्री बारमध्ये काही तरुण तरुणी जेवण्यासाठी आले होते. काही वेळाने आरोपी मिहीर मिश्रा हा आपल्या साथीदारांसह तेथे आला व त्यांनी दारु पिण्यास सुरुवात केली. दरम्यान या तरुणी सेल्फी काढण्यात मग्न असताना आरोपी मिश्रा त्यांच्याजवळ जाऊन स्वत:सोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करू लागला. त्यांनी नकार देताच त्याने लगट सुरू केली व लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून या तरुणींच्या मित्रांपैकी एक, राजेश इंद्रपाल कुशवाहा (३०) याने मिश्राला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर कमरेला खोचलेली पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली. त्याचा नेम चुकल्याने कुशवाह वाचला. या घटनेमुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ झाला. हॉटेल कर्मचारी व मिश्राच्या मित्रांनी त्याला कसेबसे आवरून हॉटेलबाहेर नेले व त्यानंतर तो पळून गेला. या प्रकरणाची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचले. राजेशने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिहीर मिश्राविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, धमकी देणे व विनापरवाना घातक शस्त्र बाळगणे याबाबत गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर मिहीर मिश्राला अटक झालेली नव्हती.