पोलीस ठाण्यात फायरिंग... यूपी, एमपी अन् आता महाराष्ट्र

By नरेश डोंगरे | Published: February 5, 2024 12:01 AM2024-02-05T00:01:37+5:302024-02-05T00:02:10+5:30

बिहार, उत्तरप्रदेश मध्ये अशा घटना गृहित धरल्या जात होत्या. तिकडे जंगलराज असल्याची टिका होत होती.

Firing in police station... UP, MP and now Maharashtra; Ganpat Gaikwad issue | पोलीस ठाण्यात फायरिंग... यूपी, एमपी अन् आता महाराष्ट्र

पोलीस ठाण्यात फायरिंग... यूपी, एमपी अन् आता महाराष्ट्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगर असो अथवा छोटे शहर, त्या ठिकाणचे सर्वात सुरक्षित स्थळ म्हणजे पोलीस स्टेशन ! त्यामुळे सर्वसामान्य पीडित व्यक्ती थोडे काही धाकधुक झाले तर थेट पोलीस ठाणे गाठतो. एवढेच काय, एखादा कुख्यात गावगुंडही धोक्याची कल्पना येताच सरळ पोलीस ठाण्यात धाव घेतो. या ठिकाणी आपल्याला काही होणार नाही, येथे आपण सुरक्षित राहू, असा प्रत्येकाला विश्वास वाटतो. मात्र, गेल्या काही दिवसांत चक्क पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या जाऊ लागल्याने या विश्वासाला तडे जाऊ लागले आहे. बिहार, उत्तरप्रदेश मध्ये अशा घटना गृहित धरल्या जात होत्या. तिकडे जंगलराज असल्याची टिका होत होती. मात्र, बिहार, युपीतील हे खतरनाक लोण आता एमपी मार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. सत्तापक्षातील आमदाराने मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर शुक्रवारी रात्री चक्क हिललाईन (उल्हासनगर) ठाण्यात गोळ्या झाडून देशभरात खळबळ उडवून दिली आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात नागपूरसह विविध ठिकाणी यापूर्वी घडल्या. गडचिरोलीत कॅम्पवर असलेल्या पोलीस शिपायाने आपल्याच सहकाऱ्यावर गोळ्या झाडल्याचीही घटना दोन वर्षांपूर्वी घडली. मात्र, एखाद्या आमदाराने चक्क पोलीस ठाण्यात राजकीय पक्षाच्या नेत्यावर गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न करण्याची ही घटना वेगळीच आहे.

बेहडी (बरेली) पोलीस स्टेशन
गेल्या दोन वर्षांत पोलीस ठाण्यात गोळी झाडून कुण्याच्या हत्येचा प्रयत्न करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उत्तर प्रदेशात घडल्या. यातील पहिली घटना ११ सप्टेंबर २०२२ बेहडी (बरेली) पोलीस ठाण्यात घडली. सोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी संबंधित नाजूक प्रकरणावरून एका कॉन्स्टेबलने ठाण्यात अंधाधूंद गोळ्या झाडल्या होत्या. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

अलिगड (कोतवाली) पोलीस स्टेशन
उत्तर प्रदेशातीलच अलिगडमधील एका ठाण्यात आलेल्या एका निरपराध महिलेवर ठाणेदाराने गोळी झाडली होती. ८ डिसेंबर २०२३ ला ही घटना घडली. या घटनेने गेल्या वर्षी सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली होती.

रिवा (मध्य प्रदेश) पोलीॅस स्टेशन
कामाचा ताणतणाव अन् देण्याघेण्यावरून खटकल्यामुळे २७ जुलै २०२३ ला पीएसआय बी. आर. सिंह याने ठाणेदार हितेंद्रनाथ शर्मा यांच्यावर गोळी झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. मध्यप्रदेशातील रिवा, सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात ही घटना घडली होती.

Web Title: Firing in police station... UP, MP and now Maharashtra; Ganpat Gaikwad issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.