जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार
By Admin | Published: June 4, 2017 01:58 AM2017-06-04T01:58:43+5:302017-06-04T01:59:03+5:30
नाशिक : कळवण तालुक्यातील दळवटमार्गे गुजरात राज्यात शेतमालाची वाहतूक होत असल्याचे समजताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी दळवटकडे कूच करत वाहने अडवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कळवण तालुक्यातील दळवटमार्गे गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे व अन्य शेतमालाची वाहतूक होत असल्याचे समजताच तालुक्यातील शेतकऱ्यांनी दळवटकडे कूच करत वाहने अडवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारसह हवेत गोळीबार केला. शनिवारी तिसऱ्या दिवशीही शेतकरी संपाची धग कायम आहे.
पोलिसांनी दळवटकडे धाव घेत उपस्थित शेतकरी बांधवांना वाहने मार्गस्थ करण्याबाबत विनंती व सूचना केली; परंतु शेतकरी कोणाचेही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारसह हवेत गोळीबार करावा लागला.
दरम्यान, पोलीस जिल्हाप्रमुख अंकुश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती जाणून घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपासून आदिवासी भागात सुरू असलेल्या संपाने काही भागात हिंसक वळण घेतले आहे.
कळवण तालुक्यातून दळवटमार्ग गुजरात राज्याकडे मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य शेतमालाची वाहतूक होत असून, गेल्या दोन दिवसात कनाशी, वरखेडा, दळवट व जीरवाडे येथे वाहने अडवून शेतमाल रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त करण्यात आला.