निर्मल ग्राम योजनेचा फज्जा
By admin | Published: November 11, 2014 12:57 AM2014-11-11T00:57:06+5:302014-11-11T01:09:34+5:30
भिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे
नांद येथे घाणीचे साम्राज्य : सार्वजनिक शौचालयाचा वापर होणार कधी?
राम वाघमारे - नांद
भिवापूर तालुक्यातील नांद येथे निर्मल ग्राम योजना राबविण्यात आली. मात्र, या गावात सर्वत्र घाण पसरली आहे. येथील सार्वजनिक शौचालयाचा वापर कुणीही करीत नाही. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
राज्य शासनाच्यावतीने निर्मल ग्राम योजनेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. नांद येथे स्थानिक ग्रामपंचायतच्यावतीने ही योजना राबविण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाने हागणदारीमुक्त गाव करण्याचा संकल्प केल्याने या योजनेंतर्गत नांद येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. या शौचालयात पाण्यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, स्थानिक ग्रामस्थ या सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता उघड्यावर जाणे पसंत करीत आहेत. परिणामी, लाखो रुपये खर्च करूनही या योजनेला हरताळ फासला जात आहे.
सदर शौचालयाचे बांधकाम वर्षभरापूर्वी स्थानिक आठवडी बाजारालगत असलेल्या रिकाम्या जागेवर करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आलेल्या या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याच्या दाराला सदैव कुलूप लावले असल्याचे दिसून येते. या शौचालयाच्या शेजारी नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम नेमके कशासाठी केले, असा प्रश्न उपस्थित होतो. गावात येणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण आहे.
या शौचालयापासून अवघ्या २०० मीटरवर सरपंच भारती भैसारे यांचे घर आहे. शौचालयालगत रस्ता गावात येत असल्याने या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. याच रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य केंद्रही आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या - येणाऱ्या प्रत्येकाला या घाणीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून परिसरात पसरलेली घाण साफ करण्याची तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.