फिरूनी नवे जन्मेन मी...मृत्यूला हरवून जिंकली आयुष्याची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:53 AM2019-05-29T00:53:32+5:302019-05-29T00:55:08+5:30
एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोडून बारावीत कला विभागात (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेतला. या विपरीत परिस्थितीत ती हरली नाही, लढली. तिची जिद्द, तिची झुंज व्यर्थ गेली नाही. एक वेळ डॉक्टरांनीही नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही तिच्यासोबत होते ते आईवडिलांचे प्रयत्न आणि विश्वास. कला विभागात ९५.६ टक्के गुणांसह शहरातून टॉपर ठरलेली पाखी अरुणीकुमार मोर ही विद्यार्थिनी म्हणजे मृत्यूला हरवून आयुष्याची लढाई जिंकणे कशाला म्हणतात, याचे जिवंत उदाहरण होय.
निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका भीषण अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने सहा महिने कोमात घालविले. त्यातून बाहेर निघल्यानंतरही मृत्यूशी संघर्ष सुरूच होता. शरीराचा उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी झाला आणि बोलणेही अशक्य झाले. पुढचे काही महिने या अवस्थेशी सामना करीत तिने सायन्स सोडून बारावीत कला विभागात (इंग्रजी माध्यम) प्रवेश घेतला. या विपरीत परिस्थितीत ती हरली नाही, लढली. तिची जिद्द, तिची झुंज व्यर्थ गेली नाही. एक वेळ डॉक्टरांनीही नकारात्मक अभिप्राय दिल्यानंतरही तिच्यासोबत होते ते आईवडिलांचे प्रयत्न आणि विश्वास. कला विभागात ९५.६ टक्के गुणांसह शहरातून टॉपर ठरलेली पाखी अरुणीकुमार मोर ही विद्यार्थिनी म्हणजे मृत्यूला हरवून आयुष्याची लढाई जिंकणे कशाला म्हणतात, याचे जिवंत उदाहरण होय.
पाखीने मिळविलेले यश संकटाशी झुंजणाऱ्या योद्ध्याप्रमाणे आहे. पाखी अभ्यासात अत्यंत हुशार व दहाव्या वर्गात ९८.८ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पाखीच्या गुणवत्तेची चाहूल लागली होती. तेवढ्याच आत्मविश्वासाने विज्ञान विभागात प्रवेश घेतला. अकरावीनंतर बारावी सुरू झाली. यावेळी दहावीपेक्षा अधिक यश मिळविण्याची जिद्द तिने बाळगली होती. पण नियतीला वेगळेच मंजूर होते. एक जीवघेणे संकट तिच्यावर ओढवले. एका भीषण अपघातात मेंदूला जबर मार लागला आणि ती थेट मृत्यूच्या दाढेत लोटल्या गेली. वडील अरुणीकुमार मोर हे उद्योजक, त्यामुळे लाडक्या मुलीच्या उपचारात त्यांनी सर्वस्व झोकून दिले. डॉक्टरांनी मात्र नकारात्मकता दर्शविल्याने आईवडील थोड खचले, पण अखेरपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही, हा त्यांचा निर्धार. नागपूरनंतर मुंबईला उपचार सुरू केला. त्यांच्या विश्वासाला यश आले आणि सहा महिने कोमात राहिलेली पाखी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. पण उजवा भाग अर्धांगवायूने निरुपयोगी ठरला होता व त्यात वाचाही गेली होती. डॉक्टरांनी तिला घरी नेण्यास सांगितले. हा वेळ त्यांच्यासाठी कठीण होता. पुढचे काही महिने वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरत आईवडिलांनी पाखीला या जीवघेण्या अवस्थेतून बाहेर काढले. नवजात बालक जसे बोबडे बोलतात आणि पाय अडखळत चालतात, तसा पाखीचा नवा जन्म झाला होता.
तिने विज्ञान सोडून हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमासह बारावी कला विभागात प्रवेश केला. मुलगी शक्य होईल तशी कॉलेजमध्ये येऊन अभ्यास करावी, रमावी ही आईवडिलांची जिद्द. तीही एखाद्या फायटरप्रमाणे झुंजायला सज्ज होती.
शिक्षकांनी व मित्रांनीही तिच्या या अवस्थेत मोलाची साथ दिली. तिची झुंज, आत्मविश्वास आणि गुणवत्ता, आईवडिलांचा विश्वास यामुळे यश तिच्या पायाजवळ चालून आले. वर्षभरापूर्वी आयुष्याशी संघर्ष करणारी पाखी कला विभागात टॉपर ठरली. आजही तिचा उजवा भाग कमकुवत आहे, ती आधार घेऊन अडखळत चालते, संघर्ष करीतच बोलते व हातात पेनही घेता येत नाही. काहींना तिचा नवा जन्म आणि हे यश चमत्काराप्रमाणे वाटते. पण यामागे होता आईवडिलांचा विश्वास, डॉक्टरांचे प्रयत्न आणि पाखीने बाळगलेली ‘फिरूनी नवे जन्मेन मी...’ ही जिद्द.