आधी गावाची लढाई मग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:20+5:302020-12-16T04:26:20+5:30
काँग्रेसचा निर्णय शनिवारी : शिवसेना,राष्ट्रवादीही दंड थोपटणार नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला निवडणूक होऊ ...
काँग्रेसचा निर्णय शनिवारी : शिवसेना,राष्ट्रवादीही दंड थोपटणार
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला निवडणूक होऊ घातली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीत महाविकास आघाडीची काय भूमिका राहील,याकडे पोलपंडितांचे लक्ष लागले आहे. मुळात ग्रा.प.निवडणुक राजकीय पक्ष त्यांच्या चिन्हावर लढत नाहीत. त्यांचे समर्थक निवडणूक लढवितात. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातही महाविकास आघाडी ग्रा.प.निवडणूक एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र जिल्हा परिषद आणि नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. नेते एकत्र आले तर कार्यकर्त्यांनी एकमेकाविरोधात लढून उपयोग काय, अशी भूमिका जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील दमदार यशानंतर गावपातळीवर काँग्रेसचा कार्यकर्ता सध्या फॉर्मात आहे. मात्र ग्रा.प. निवडणुकीसाठी पक्षाने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे गावपातळीवर स्वबळावर किल्ला लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. ग्रा.प. निवडणुकीसंदर्भात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर शनिवारी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काँग्रेसचे दोन गट एकाच गावात एकमेकाविरोधात लढणार नाही, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. इकडे ग्रा.प. निवडणुकात स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे लक्षात घेत शिवसेना ही निवडणूक लढणार असल्याचे जिल्हा प्रमुख (ग्रामीण) राजू हरणे यांनी सांगितले. काटोल आणि नरखेड तालुक्यात आजवर गावागावत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना राहिला आहे. ग्रा.प.तही तो होईलच असे हरणे यांनी स्पष्ट केले. इकडे राष्ट्रवादीने ग्रा.प. निवडणुक स्थानिक कार्यकर्त्यांच्या बळावर लढविण्याची तयारी चालविली आहे. मात्र आघाडी धर्म कायम असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले.
तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?
नागपूर जिल्ह्यात १३० ग्रा.पं.ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढण्याची स्थिती सध्या कोणत्याही गावात दिसत नाही. काटोल विधानसभा क्षेत्रातील ग्रा.पं.मध्ये शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजप समर्थक अशी तिरंगी लढत होईल. रामटेक विधानसभेत पुन्हा शिवसेना आणि काँग्रेसचे समर्थक एकमेकाविरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहे. येथे या दोन्ही पक्षांचा मुकाबला भाजप समर्थकांशी असेल. कामठी मतदारातसंघात मौदा तालुक्यात काँग्रेस,राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. उमरेड मतदार संघात कुही तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप अशीच लढत होईल. सावनेरमध्ये मात्र काँग्रेस विरुद्ध भाजप समर्थक असा थेट सामना होण्याची स्थिती आहे.
जि.प.,पं.स.त महाविकास आघाडीचा दबदबा
नागपूर जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस नंबर वनचा पक्ष आहे. जि.प.निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होती. अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील १३ पं.स.पैकी ८ पं.स.काॅंग्रेसकडे आणि ३ पं.स.मध्ये राष्ट्रवादीला बहुमत आहे.
सरपंच निवडीसाठी एकत्र येणार
ग्रां.प. निवडणुकीत गावपातळीवरील राजकारणाला महत्त्व अधिक असते. हीच स्थिती निवडणूक होऊ घातलेल्या जिल्ह्यातील बहुतांश गावात आहे. त्यामुळे येथे महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. मात्र सरपंच निवडीसाठी महाविकास आघाडीचा काही ग्रां.प. मध्ये प्रयोग करण्यावर तिन्ही पक्षातील काही नेत्यात एकमत असल्याचे दिसून येते.
लढल्यास काय परिणाम?
ग्रा.पं.निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र सरपंच निवडीत या तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन निर्णय घेतील असे सध्याचे चित्र आहे. ग्रां.प.निवडणूक तिन्ही पक्षाचे समर्थक एकत्र लढले तर गावपातळीवरील विकासाचे मुद्दे मागे पडतील, हे निश्चितच.