प्रथम बी.एड. केलेला मुख्याध्यापकपदास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 04:30 AM2018-12-02T04:30:43+5:302018-12-02T04:30:45+5:30
मुख्याध्यापक पदासाठी सेवाज्येष्ठता ही शिक्षकाच्या नियुक्तीवरून नाही, तर शिक्षकाने बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
नागपूर : मुख्याध्यापक पदासाठी सेवाज्येष्ठता ही शिक्षकाच्या नियुक्तीवरून नाही, तर शिक्षकाने बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
नागपुरातील डॉ. दे. वा. दुरुगकर आदर्श भारत विद्यालयातील मुख्याध्यापक पदासाठी दोन शिक्षकांमध्ये सेवाज्येष्ठतेवरूनचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयाने पहिले बी. एड. केलेला शिक्षकच मुख्याध्यापकपदास पत्र ठरेल, असा निर्णय देऊन शिक्षण क्षेत्रातील कमालीची गुंतागुंत सोडविली आहे. हिंगण्यातील डॉ. दे. वा. दुरुगकर आदर्श भारत विद्यालयात पिलाजी उरकांदे यांची १९८२ ला नियुक्ती झाली होती. त्यांनी १९९४ ला बी. एड. केले. तर फलके यांनी १९९१ ला बी. एड. पदवी प्राप्त केली.
सेवाज्येष्ठता यादीमध्ये पिलाजी उरकांदे यांना गोपाल फलके यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठ दाखविले. त्यावर उरकांदे यांनी खंडपीठात आव्हान दिले होते.
>शिक्षक संवर्गाला न्यायालयाने दिले प्राधान्य
एमईपीएस विनियम अधिनियम १९७७ च्या अनुसूची (फ) नुसार शिक्षकांचे प्रवर्ग पाडण्यात आले आहे. त्यातील संवर्ग (क) मध्ये जेव्हा एखादा शिक्षक बी. एड. ही व्यवसायिक अर्हता प्राप्त करतो, तेव्हापासून तो संवर्ग (क) मध्ये येतो. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन शालेय शिक्षण विभाग, खासगी व्यवस्थापन मंडळ व मुख्याध्यापकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.