नागपुरात शाळांची पहिली घंटा वाजली ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 08:00 PM2018-06-26T20:00:08+5:302018-06-26T20:11:03+5:30

शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळेच असते. आईवडिलांच्या जिव्हाळ्याचा हात सोडून जगाच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची शिदोरी गोळा करण्याचा श्रीगणेशा याच दिवसाने होतो. दोन महिने शांत असणाऱ्या शाळांमध्ये बच्चेकंपनीचा चिवचिवाट मंगळवारी पुन्हा अनुभवायला मिळाला. शाळेचा पहिला दिवस असला तरी सगळीकडे उत्साह व चैतन्य दिसून आले. गुलाबपुष्पांनी झालेले स्वागत, खाऊची रेलचेल आणि नव्या मित्रांची गट्टी असे शाळांमध्ये वातावरण होते.

The first bell rang of schools in Nagpur ... | नागपुरात शाळांची पहिली घंटा वाजली ...

नागपुरात शाळांची पहिली घंटा वाजली ...

googlenewsNext
ठळक मुद्देशाळांनी लावल्या स्वागताच्या माळानवीन शैक्षणिक सत्राला उत्साहाने सुरुवातअनेक चिमुकल्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळेच असते. आईवडिलांच्या जिव्हाळ्याचा हात सोडून जगाच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची शिदोरी गोळा करण्याचा श्रीगणेशा याच दिवसाने होतो. दोन महिने शांत असणाऱ्या शाळांमध्ये बच्चेकंपनीचा चिवचिवाट मंगळवारी पुन्हा अनुभवायला मिळाला. शाळेचा पहिला दिवस असला तरी सगळीकडे उत्साह व चैतन्य दिसून आले. गुलाबपुष्पांनी झालेले स्वागत, खाऊची रेलचेल आणि नव्या मित्रांची गट्टी असे शाळांमध्ये वातावरण होते.
उन्हाळ्याच्या सुटीनंतर नागपूरसह विदर्भातील बहुतांश शाळांची पहिली घंटा मंगळवारी वाजली. नवीन शैक्षणिक सत्राचा पहिलाच दिवस संस्मरणीय ठरावा अन् विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा या उद्देशाने उपराजधानीतील शाळांमध्ये थाटात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्वच ठिकाणी शिक्षक व विद्यार्थी उत्साहात दिसून येत होते. अनेक महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेदेखील स्वागत करण्यात आले.
‘सीबीएसई’च्या काही शाळा अगोदरच सुरू झाल्या होत्या. मात्र शहरातील बहुतांश शाळांचे दरवाजे मंगळवारी उघडले. सकाळपासूनच रस्त्यारस्त्यांवर शाळा सुरू होण्याच्या उत्साहाचे चित्र दिसून येत होते. पालक, स्कूल बसचालक यांचीदेखील लगबग दिसून आली. शाळांमध्ये पालकांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका झाल्या. सोबतच गणवेश व पुस्तकांचे वितरणदेखील करण्यात आले.
गुलाबपुष्पांनी स्वागत
अनेक शाळांमध्ये गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यात शासकीय शाळा आघाडीवर होत्या. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी पुस्तक दिंडी आणि प्रभात फेरी यांचे आयोजन करण्यात आले होते. मेडिकल चौक परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अगदी वाढदिवसासारखी सजावट करण्यात आली होती व प्रवेशद्वारावर फुग्यांची आरास करण्यात आली. एका शाळेमध्ये तर वर्गाच्या बाहेरच मिकी-माऊस, डोरेमन, छोटा भीमचा मुखवटा घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
पालकांची धावपळ
शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे आॅटोचालक आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडायला पालकांनाच यावे लागले. प्रथमच शाळेत येणाºया मुलांची रडारड सुरू झाल्याने पालकांनाही त्यांच्यासोबत बसावे लागले. काही शाळेत विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. काही पालक शाळेला लवकर सुटी होणार असल्याने गेटवर ठिय्या मांडून होते. अनेक पालक दुचाकी-चारचाकीने आल्यामुळे खामला, देवनगर, रामदासपेठ, धरमपेठ, प्रतापनगर इत्यादी भागात शाळांसमोर ‘ट्रॅफिक जॅम’ झाल्याचे दिसून आले. विशेषत: वर्धा मार्गावर सकाळच्या सुमारास वाहनांची गर्दी दिसून आली.
वृक्षारोपण, औक्षण अन् खाऊ
शहरांतील निरनिराळ्या शाळांमध्ये विविध पद्धतींनी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बहुतांश सर्वच शाळांमध्ये सजावट करण्यात आली होती. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांनी प्रवेशोत्सवाला प्रभातफेरी काढली. काही शाळांनी प्रवेशोत्सव आनंददायी ठरावा म्हणून शैक्षणिक सिनेमा सुद्धा दाखविला. कुठे शालेय पोषण आहार शिजला, सोबत गोडाधोडाचा सुद्धा बेत होता. कुठे पाहुण्यांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले. अनेक शाळांमध्ये सरस्वती पूजनाने नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या भेटी
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, सीईओ संजय यादव, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, दीपक गेडाम, अति. सीईओ अंकुश केदार, शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी यांनी जि.प. उच्च प्राथमिक शाळा फेटरी येथे सदिच्छा भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला. उपस्थितांनी शाळा प्रवेशित मुलांना पुष्प देऊन स्वागत केले. पाठ्यपुस्तकाचे वितरणही करण्यात आले.
शाळांनी दिला सामाजिक संदेश
प्रवेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाळांनी काही सामाजिक उपक्रमही राबविले. शासनातर्फे सध्या सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या चळवळीत शाळा सहभागी झाल्या. शाळांच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. काही शाळांमध्ये व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रदूषण, स्वच्छता आदी सामाजिक विषयावर उपक्रम राबविण्यात आले.
अगोदर रडणे, मग बागडणे
आज अनेक लहानग्यांचा शालेय शिक्षणाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये त्यांना सोडायला त्यांचे पालक आले होते व शाळांच्या प्रवेशद्वारावरच मुलांच्या रडण्याचा कार्यक्रम सुरु होता. मात्र शिक्षक देखील त्यांना समजावून, खाऊ देऊन शाळेची भीती घालविण्याचा प्रयत्न करत होते. पश्चिम नागपुरातील अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सोडायला पालकांची गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थ्यांना पालकांचा हात सोडवत नव्हता तर काहींनी तर चक्क आईवडिलांनाच शाळेच्या आत सोडून देण्याचा हट्ट धरला होता. परंतु पालकांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात येत होते. शाळेच्या नियमांनुसार केवळ विद्यार्थीच आत येईल असे शिक्षकांकडून सांगण्यात आले. मुलगा शाळेत गेल्यावर पालकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. सकाळी शाळेत जाताना रडणारे चिमुकले शाळा सुटल्यावर मात्र छान रमतगमत येताना दिसले. 

Web Title: The first bell rang of schools in Nagpur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.