विदर्भातील पहिली गोवंश भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 08:00 AM2023-05-10T08:00:00+5:302023-05-10T08:00:02+5:30

Nagpur News आपण केवळ भेसळयुक्त दूध पिऊन आजारांना निमंत्रण देतो. मात्र आईव्हीएफ-ईटीटीच्या (भ्रूण प्रत्यारोपण) माध्यमातून चांगल्या प्रतिच्या गोवंशाची निर्मिती करणे शक्य आहे.

First Bovine Embryo Transplantation Laboratory in Vidarbha at Nagpur | विदर्भातील पहिली गोवंश भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा नागपुरात

विदर्भातील पहिली गोवंश भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा नागपुरात

googlenewsNext

जितेंद्र ढवळे

नागपूर : दुधाची मागणी आणि संकलन हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे. आपण केवळ भेसळयुक्त दूध पिऊन आजारांना निमंत्रण देतो. मात्र आईव्हीएफ-ईटीटीच्या (भ्रूण प्रत्यारोपण) माध्यमातून चांगल्या प्रतिच्या गोवंशाची निर्मिती करणे शक्य आहे. नाममात्र खर्चात रोज १८ लिटर दूध देणारी गाय तुम्हाला सहज मिळू शकते.

राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा (एम्ब्रिओ बायोटेक्नॉलॉजी लॅब) उभारण्यात आली आहे. दोन कोटी ९७ लाखांची गुंतवणूक असलेला या प्रकल्पाची मुहूर्तमेढ तीन वर्षांपूर्वी रोवल्या गेली. आता प्रत्यक्षात यश मिळू लागले आहे. गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात भ्रूण प्रत्यारोपणाचा (टेस्ट ट्यूब बेबी) प्रयोग यशस्वीही ठरला आहे. आता दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी या प्रयोगशाळेची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुधन संशोधन तथा पशु पैदास प्रक्षेत्र परिसरानजीक एक कोटी ७४ लाख रुपये खर्च करून अद्ययावत अशी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. येथे भ्रूण तयार करण्यापासून प्रत्यारोपणाचे कार्य विद्यापीठाचे संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुंवर आणि विभागप्रमुख डॉ. डी. एस. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात होते.

काय आहे एम्ब्रिओ बायोटेक्नॉलॉजी लॅब?

देशी गोवंशाचे संवर्धन करणे. दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी चांगल्या प्रतिच्या गायीची निर्मिती करणे हा एम्ब्रिओ बायोटेक्नॉलॉजी लॅबचा उद्देश आहे.

कसे होते प्रत्यारोपण?

यासाठी विद्यापीठाच्या पशुपैदास प्रक्षेत्रात साहिवाल, गवळाळू, देवणी, डांगी, गीर प्रजातीच्या अशा २२ ‘दाता’ गायी उपलब्ध आहेत. या गायींना हार्मोन्स (संप्रेरक) इंजेक्शन देऊन अधिक स्त्री बीजाची निर्मिती केली जाते. अट्रा साउंड मशीनच्या माध्यमातून हे बीज बाहेर काढले जातात. त्यांना इन्क्यूबेटरमध्ये परिपक्व केले जाते. यानंतर उत्कृष्ट प्रतिच्या वळूच्या विर्याशी (बायफ आणि एनडीडीबी येथील) यांचे फलन केले जाते. साधारणत: ७ दिवस ही प्रक्रिया चालते. यानंतर प्रयोगशाळेत तयार झालेल्या भ्रूणाचे इतर दुसऱ्या गायीच्या गर्भात प्रत्यारोपण केले जाते. यानंतर ४५ दिवसांनी गायीची गर्भधारणा तपासणी केली जाते.

 

आईव्हीएफ-ईटीटीच्या माध्यमातून चांगल्या प्रतिच्या गोवंशाची (टेस्ट ट्यूब बेबी)निर्मिती शक्य आहे. विदर्भात साहिवाल प्रजातीच्या गायीवर या प्रयोगात चांगले यश येत आहे. या प्रक्रियेसाठी २५ हजार रुपयांचा खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांनी गट तयार करून एकाच वेळी २० ते २५ गायींवर हा प्रयोग केला तर हा खर्च प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये लागेल.

- डॉ. मनोज पाटील, सहायक प्राध्यापक,

पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर

Web Title: First Bovine Embryo Transplantation Laboratory in Vidarbha at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय