देवाला चांदी-सोन्याची देणगी देताय..; आधी पावती आणा, मगच फेडा नवस!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 05:30 PM2023-01-09T17:30:19+5:302023-01-09T17:37:12+5:30

देवस्थान चोखंदळ : भक्ती-भावनेचा नको गोंधळ

First bring the receipt, then pay the vow of offering gold-silver to God | देवाला चांदी-सोन्याची देणगी देताय..; आधी पावती आणा, मगच फेडा नवस!

देवाला चांदी-सोन्याची देणगी देताय..; आधी पावती आणा, मगच फेडा नवस!

Next

नागपूर : श्रद्धा ही प्रत्येकाच्या परीने भिन्न असते. त्याला अंधश्रद्धेचे वेष्टणही असते आणि परोपकाराचेही असतेच. पूर्वापार चालत आलेली नवस बोलण्याची प्रथा आजही सुरूच आहे. पूर्वी देवाला बळी देण्याची प्रथा आता हद्दपार होत चालली असली तरी पैसा अडका देण्याचे बोलून नवस बोलण्याची परंपरा आजही सुरू आहे. अनेकजण देवाला नवस बोलून समाजकार्यही पार पाडत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात नकली चांदीने नवस फेडल्याचे वृत्त येताच सर्वत्र गोंधळ उडाला. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील देवस्थानांशी चर्चा केल्यावर, इथे भक्तिभावनांचा आदर करत नवस बोलणाऱ्यांना दागिन्यांची पावती मागितली जाते आणि अधिकृत सराफाकडून तपासणी केल्यावरच ते स्वीकारले जात असल्याचे पुढे आले आहे.

कसे ओळखले जातात नकली दागिने ?

- देवस्थानांच्या विश्वस्तांकडून सर्वांच्या समक्ष दानपेटी उघडली जाते. त्यात आलेले दान, वस्तूंची तपासणी व्यवस्थित केली जाते. दागिन्यांच्या बाबतीत देवस्थान कमिटीकडून नेमण्यात आलेल्या सराफाकडून त्यांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात श्रीगणेश मंदिर टेकडी, कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता देवस्थान, श्री साईबाबा देवस्थान, श्री पोद्दारेश्वर राम मंदिर आदी सर्व देवस्थानांमध्ये हीच प्रक्रिया राबवली जाते.

चांदी नव्हे व्हाइट मेटल

श्रद्धा ही अस्सलच असते, कारण, ती संवेदनेशी निगडित असते. त्यामुळे, भाविक चांदी म्हणा वा सोने आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला गुप्तदान म्हणून अर्पण करत असतात. मात्र, बरेचदा तपासणीमध्ये अशा वस्तू नकली असल्याचे पुढे येते. ही संबंधित विक्रेत्याकडून भक्तांची झालेली फसवणूक म्हणून बघितली जाते. विक्रेते भोळ्या भक्तांना चांदी म्हणून व्हाईट मेटल विकत असल्याचेही वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, भक्तांनी अशा वस्तू खरेदी करताना अधिकृत पावती घेणे गरजेचे आहे.

विश्वस्त ज्वेलर्सकडूनच करा खरेदी

देवस्थानात दान प्रक्रिया पेटीमध्ये देण्याऐवजी थेट काऊंटरवर पार पाडण्याचे आवाहन केले जाते आणि त्यासाठी रीतसर पावती दिली जाते. बरेच भक्त दागिने अर्पण करत असतात. तेव्हा त्यांच्याकडून त्याची पावती मागितली जाते. पावती नसल्यास आमचे अधिकृत सराफ असलेले उदापुरे ज्वेलर्स यांच्याकडून तत्काळ दागिन्यांची तपासणी केली जाते आणि नंतरच ते स्वीकारले जातात. भक्तांनी चांदी असो वा सोने विश्वस्त ज्वेलर्सकडूनच खरेदी करावे, असे आवाहन मंदिराकडून नेहमीच केले जाते.

- संजय जोगळेकर, सदस्य, श्री गणेश मंदिर टेकडी

Web Title: First bring the receipt, then pay the vow of offering gold-silver to God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.