प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना फटकारले

By admin | Published: March 29, 2015 02:33 AM2015-03-29T02:33:50+5:302015-03-29T02:33:50+5:30

वैद्यकीय प्रकरणात अविचारपूर्वक आदेश दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेहकर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले.

First class magistrate reprimanded | प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना फटकारले

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना फटकारले

Next

नागपूर : वैद्यकीय प्रकरणात अविचारपूर्वक आदेश दिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेहकर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले. तसेच, यापुढे असे आदेश देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मेहकर येथील डॉ. विलास वऱ्हाडे व पॅथालॉजीतज्ज्ञ दीपक जैताळकर यांच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप झाला होता. वैद्यकीय मंडळाने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोघांनाही वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी धरता येणार नसल्याचा अहवाल दिला. परिणामी पोलिसांनी एफआयआर नोंदविला नाही. यामुळे तक्रारकर्त्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांना आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिलेत. या आदेशाला डॉ. वऱ्हाडे व जैताळकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वैद्यकीय प्रकरणातील तथ्ये व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचे अवलोकन न करता पूर्णपणे अविचारीपणे हा आदेश देण्यात आला आहे असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत आदेश देताना प्रकरणातील तथ्ये व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांकडे दुर्लक्ष करू नये, असे न्यायालयाने स्पष्ट करून वादग्रस्त आदेश व एफआयआर रद्द केला आहे. तसेच, हे प्रकरण सदर निर्णयातील निरीक्षणांच्या आधारावर पुढील कार्यवाही करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परत पाठविण्यात आले आहे. तक्रारकर्त्याला २७ एप्रिल रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: First class magistrate reprimanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.