देशातील पहिले कोर्ट ई-रिसोर्स सेंटर नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 08:29 PM2020-10-26T20:29:18+5:302020-10-26T20:31:57+5:30
First court e-resource center in the country, Nagpur News कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणींना हरवून न्यायव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी नागपूरमध्ये कोर्ट ई-रिसोर्स सेंटर उभारण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणींना हरवून न्यायव्यवस्थेला गतिमान करण्यासाठी नागपूरमध्ये कोर्ट ई-रिसोर्स सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमधून वकील व पक्षकारांना सर्वोच्च व उच्चसह इतर सर्व न्यायालयांमध्ये ऑनलाईन याचिका दाखल करता येणार आहे. तसेच, ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभागी होता येणार आहे. हे अशाप्रकारचे देशातील पहिलेच सेंटर असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
कोरोना संक्रमणामुळे न्यायालयांमध्ये ऑनलाईन सुनावणी होत आहे. याचिकाही ऑनलाईन दाखल केल्या जात आहेत. परंतु, याकरिता आवश्यक असलेल्या ई-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक वकील व पक्षकारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. न्यायालयांमध्ये आणखी काही महिने नियमित कामकाज सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ई-कामकाज पुढेही कायम राहणार आहे. ही बाब लक्षात घेता, उच्च न्यायालय प्रशासनाने सिव्हिल लाईन्स येथील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण केंद्रामध्ये कोर्ट ई-रिसोर्स सेंटर उभारले आहे. नागपूर खंडपीठाच्या प्रशासकीय व्यवस्थापक अंजू शेंडे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, या सेंटरमध्ये सर्व ई-सुविधा असलेल्या १० साऊंड प्रूफ केबिन्स आहेत. तेथून वकील व पक्षकारांना विविध न्यायालयीन कामे ऑनलाईन करता येतील.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व नागपूरचे सुपुत्र शरद बोबडे यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे आदी उपस्थित राहतील.
बैठकीत झाली सविस्तर चर्चा
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये ई-रिसोर्स सेंटर सर्व बाबतीत सक्षम करण्यावर आणि उद्घाटन कार्यक्रम आयोजनावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आदी अधिकारी उपस्थित होते.