पराभवाचा इजा, बिजा अन् अखेर विजयाचा तिजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 08:47 PM2020-12-04T20:47:45+5:302020-12-04T20:55:20+5:30
Nagpur News Election मागील पाच दशकांहून अधिक कालावधीपासून भाजपचा वरचष्मा राहिलेल्या मतदारसंघात वंजारी यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली आहे. मात्र वंजारी यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवत अभिजित वंजारी यांनी अनोखा इतिहास रचला आहे. मागील पाच दशकांहून अधिक कालावधीपासून भाजपचा वरचष्मा राहिलेल्या मतदारसंघात वंजारी यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली आहे. मात्र वंजारी यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. दोन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती व त्यात पराभवाचा सामना केल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नांत ते विधान परिषदेत पोहोचले आहेत.
४७ वर्षीय वंजारी यांनी याअगोदर दोन विधानसभा निवडणुकांसह महानगरपालिकेची एक निवडणूक लढविली होती. नागपुरात त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. वडील गोविंदराव वंजारी हे राजकीय क्षेत्रातच असल्याने वंजारी यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले. गोविंदराव वंजारी आमदारदेखील होते. अभिजित यांनी १९८८ ते २००२ पर्यंत एनएसयूआयचे सरचिटणीस म्हणून कामदेखील पाहिले. २००५ च्या निवडणुकीत वंजारी यांना मोठा धक्का बसला. त्यांचे वडील गोविंदराव वंजारी यांचा दक्षिण नागपुरातून विजय झाला. परंतु निकालानंतर शपथ घेण्याअगोदरच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.
पोटनिवडणुकीत वंजारी यांनी पक्षाला तिकीट मागितले होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्याने वंजारी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना यश मिळू शकले नाही व त्यांनी परत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. पक्षसंघटनेत वंजारी यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
२०१४ मध्ये त्यांनी पूर्व नागपूरातून निवडणूक लढविली. त्यात भाजपचे कृष्णा खोपडे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मागील दोन वर्षांपासून वंजारी यांनी पूर्ण लक्ष पदवीधरच्या निवडणुकीवर केंद्रित केले होते.
विद्यापीठात लक्षणीय कामगिरी
अभिजित वंजारी यांनी शिक्षणक्षेत्रात कार्य सुरू ठेवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा तसेच व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. या कालावधीत त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली व अनेकदा विद्यार्थी हितासाठी प्रशासनाविरोधात भूमिकादेखील घेतली.
तायवाडे यांच्या कामाचादेखील फायदा
पदवीधरच्या २००८ व २०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरी व अनिल सोले यांच्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. बबन तायवाडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना दोन्ही वेळा यश मिळाले नाही, मात्र त्यांनी समर्थकांची मोट निश्चित बांधली होती. वंजारी यांना त्याचादेखील मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला.