दहा लाखांवर नागपूरकरांनी घेतला पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 01:37 PM2021-08-06T13:37:05+5:302021-08-06T13:40:08+5:30
Nagpur News गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर शहरातील दहा लाखांवर नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर चार लाखांवर नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर शहरातील दहा लाखांवर नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर चार लाखांवर नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे.
संपूर्ण देशासह नागपुरातही १६ जानेवारी रोजी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. नागपुरात टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणारे, तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व व्यक्ती, चौथ्या टप्प्यात ३० वर्षांवरील सर्व व्यक्ती तर पाचव्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. प्रारंभी मनपा व शासकीय मिळून केवळ चार केंद्रांवर सुरू करण्यात आलेले लसीकरण आज १५० पेक्षा अधिक केंद्रांवरून होत आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रत्यक्ष लसीकरण जुलै महिन्यात सुरू होऊनही केवळ एका महिन्यात या वयोगटांतील लस घेणाऱ्यांचा आकडा ४ लाख ९ हजार १९८ इतका विक्रमी आहे.
मनपातर्फे लसीकरणाला गती देण्यासाठी ड्राईव्ह इन वॅक्सिनेशन सेंटर दोन ठिकाणी सुरू करण्यात आले. तसेच परदेशात शिक्षणासाठी, कामासाठी आणि खेळ स्पर्धांसाठी जाणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली. या व्यतिरिक्त तृतीयपंथी, बेघर, अंथरूणावर खिळून राहणाऱ्या व्यक्तींसाठी, दिव्यांगांसाठी, तसेच गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था मनपाकडून करण्यात आली आहे.