पहिले इको फ्रेंडली विमान पोहोचले नागपुरात
By admin | Published: March 20, 2016 03:11 AM2016-03-20T03:11:38+5:302016-03-20T03:11:38+5:30
नागपूर ते दिल्लीदरम्यान नवे उड्डाण शुक्रवारी नव्या विमानाने सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ...
दररोज उड्डाण : इंडिगोला मिळणार १८० विमाने
नागपूर : नागपूर ते दिल्लीदरम्यान नवे उड्डाण शुक्रवारी नव्या विमानाने सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी हातात एअरलाईन्सचे झेंडे घेऊन प्रवाशांचे स्वागत केले. विमान उतरल्यानंतर फायर टेंडरद्वारे विमान धुण्यात आले. या विमानाचे एरोब्रीजच्या अॅप्रॉनमध्ये पार्किंग करण्यात आले.
उपराजधानीतून दिल्लीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता आणखी पर्याय उपलब्ध होत आहेत. सकाळी दिल्लीला जाऊन सायंकाळी परत येणाऱ्यांसाठी हे विमान सुविधाजनक आहे. दिल्लीवरून फ्लाईट क्रमांक ६ ई ९२९ दररोज दुपारी ४.१० वाजता उड्डाण करून नागपुरात सायंकाळी ५.५० वाजता येईल. एक तासानंतर फ्लाईट क्रमांक ६ ई ९३२ नागपूरवरून दिल्लीसाठी रवाना होईल. विमानात सर्व इकॉनॉमिक क्लासच्या सीट आहेत. त्याचे कमीतकमी भाडे ३६०० रुपये आहे. शुक्रवारी पहिल्या फ्लाईटमध्ये १५० प्रवासी दिल्लीवरून नागपुरात आले आणि १७० प्रवासी दिल्लीला रवाना झाले. (प्रतिनिधी)
१५ टक्के इंधनाची बचत
इंडिगो एअरलाईन्सच्या दलात सामील होत असलेल्या १८० नव्या विमानांपैकी सर्वात आधी एअरबस ३२० नागपूर एअरपोर्टवर उतरली. एअरलाईन्सजवळ एअरबस ३२० आधीच उपलब्ध आहे. परंतु नव्या विमानांचे इंजिन वेगळ्या पद्धतीचे आहे. हे इंजिन जुन्या मॉडेलपेक्षा १५ टक्के इंधनाची बचत करते. याशिवाय यातून कार्बन निघण्याचे प्रमाण कमी असून प्रवासी क्षमता १८० आहे.
पुढील महिन्यात दोन नवे विमान
इंडिगो एअरलाईन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात पुढील महिन्यात दोन नव्या ए-३२० विमानांची उड्डाणे सुरू केली जाऊ शकतात. त्यासाठी एअरलाईन्सची तयारी सुरू आहे. नवी विमाने आल्यानंतर नागपुरातून बाहेर पाठविण्यात येणाऱ्या आणि बाहेरून नागपुरात येणाऱ्या कार्गोसाठी सुविधा वाढणार आहेत.
हैदराबादसाठी नवे विमान
नागपुरातून हैदराबादसाठी ट्रुजेटची नवी फ्लाईट सुरू होऊ शकते. विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यासाठी संबंधित एअरलाईन्स छोटे एटीआर विमान चालविणार आहे. याची क्षमता ७२ प्रवाशांची राहणार असून ही फ्लाईट दररोज राहील.