राज्यातील पहिली ‘एण्डोक्रिनोलॉजी लॅब’ मेडिकलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:39+5:302021-06-04T04:07:39+5:30
नागपूर : मधुमेहाचे निदान लवकर झाले नाही, तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, ...
नागपूर : मधुमेहाचे निदान लवकर झाले नाही, तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. यामुळे मधुमेहाशी संबंधित चाचण्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. यासाठी मेडिकलने पुढाकार घेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘एण्डोक्रिनोलॉजी लॅब’ उभारली आहे. राज्यात शासकीय रुग्णालयांमधील ही पहिली ‘लॅब’ असल्याचे म्हटले जाते.
भारतात मधुमेहाच्या रुग्णांचा टक्का वाढत चालला आहे. जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. यामुळे पूर्वी श्रीमंतांचा मानला जाणारा हा आजार आता सर्वच आर्थिक स्तरांमध्ये पाहायला मिळतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूचओ) २०३० मध्ये सर्वाधिक मृत्यूंना जबाबदार असणाऱ्या रोगांमध्ये मधुमेहाचा सातवा क्रमांक असेल. यामुळे मधुमेहाला दूर ठेवणे व झाल्यावर तो नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. यासाठी तातडीने निदान, औषधोपचार, योग्य आहार व व्यायाम महत्त्वाचा ठरतो. परंतु मेडिकलमध्ये मधुमेहाच्या सामान्य चाचण्या व्हायच्या. परंतु हार्माेन्सशी संबंधित चाचण्यांसाठी रुग्णांना बाहेर खासगी प्रयोगशाळेत पाठविले जात होते. मेडिकलमध्ये येणारे बहुसंख्य रुग्ण गरीब असल्याने त्यांना या महागड्या चाचण्या परडवत नव्हत्या. याची दखल घेत मेडिकलने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘एण्डोक्रिनोलॉजी’ विभागासाठी स्वतंत्र लॅब तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. शासनाने यंत्र उपलब्ध करून देताच ३१ मेपासून लॅब रुग्णसेवेत सुरू झाली. याचे उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी केले. याप्रसंगी विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. सुनील अम्बुलकर, डॉ. परिमल तायडे, डॉ. सोनवणे उपस्थित होते. या लॅबसाठी ‘सुपर’मधील पॅथॉलॉजीमधील डॉक्टर व तंत्रज्ञ मदत करीत आहे.
- तीन महिन्यातील रक्तातील साखरेच्या पातळीची माहिती
‘ एलआयएआयएसओएन केमिल्युमिन्सेस एनालायझर’ यंत्राच्या मदतीने होणाऱ्या ‘एचबीए१सीडी१०’ नावाच्या चाचणीमुळे मागील तीन महिन्यात मधुमेहाच्या रुग्णांमधील शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीची (ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन) माहिती करता येणे आता शक्य झाले आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करताना मदत होणार आहे. याशिवाय, हार्माेन्सशी संबंधित चाचण्या या यंत्रावर केल्या जात आहेत.
- मधुमेहाच्या रुग्णांना मोठा फायदा ()
राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मेडिकलमधील ही पहिली ‘एण्डोक्रिनोलॉजी लॅब’ आहे. अत्यंत अद्ययावत या यंत्रामुळे मेडिकलमध्ये येणाऱ्या विशेषत: गरीब व मध्यम रुग्णांना याचा फायदा होत आहे. तातडीने निदान होत असल्याने उपचारात मदत मिळत आहे. येथील चाचण्यांचे शुल्क शासकीय नियमानुसार आकारले जात आहे.
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल