आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 03:15 PM2022-03-08T15:15:19+5:302022-03-08T15:26:46+5:30
८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसांपासून हे पथक कार्यान्वित होणार आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरणार आहे.
नागपूर : एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंब आणि समाजाला शिक्षित करते. त्याच पार्श्वभूमीवर महिलांना वाहतूक नियमांबाबत जागृती करून अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागातील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ‘सावित्री’ पथक तयार करण्यात आले. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसांपासून हे पथक कार्यान्वित होणार आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभाग, नागपूर (ग्रामीण व शहर) यांच्याद्वारे स्वतंत्रपणे महिलांच्या नियंत्रणातील वाहन तपासणी पथक हे नुसतेच वाहन तपासणीपुरते मर्यादित न ठेवता, बहूआयामी स्पर्श करणारे, महिलांचे व्यापक हित लक्षात घेऊन ‘सावित्री पथक’ या नावाने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण व प्रशिक्षण, अंमलबजावणी, जनजागृती व सेवा आणि सामाजिक दायित्व या चार उद्देशावर हे पथक काम करणार आहे.
शाळांपासून ते मॉल्समध्ये शिक्षण व प्रशिक्षण
सावित्री पथकाच्या प्रमुख व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, हे पथक आठवड्यातून एकदा शाळा, कॉलेज, मॉल व सोसायट्यांमध्ये जाऊन आरटीओशी संबंधित सेवांची माहिती, वाहन चालवताना स्वत:सह वाहनांची घ्यायची काळजी, वाहनांबाबत तांत्रिक ज्ञान,वाहनांशी संबंधित विविध कागदपत्रे,रस्त्यावरील नियम सांगण्यासोबतच महिलांना रोजगारासह केंद्र व राज्याच्या योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.
महिलांना सिम्युलेटरवर विशेष प्रशिक्षण
वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, वाहन चालविताना त्यांच्या हातून अपघात होऊ नये या उद्देशाने शहर,ग्रामीण व पूर्व आरटीओ कार्यालयात ‘सिम्युलेटर’ स्थापन करण्यात आले. आठवड्यातून एक दिवस महिलांचा एक ग्रुप तयार करून त्यांना या ‘सिम्युलेटर’वर प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे वाहनचालविताना घ्यावयाच्या खबरदाऱ्यांबाबत त्यांच्या कुटुंबातही चर्चा होऊन अपघात कमी होण्यास मदत होईल, असेही मेढे म्हणाल्या. या प्रकल्पाची संकल्पना परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हाधिकारी विमला आर. यांची असल्याचे नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व शहरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.