आधी एक लाखाचा दंड मगच लग्न...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:04+5:302021-08-01T04:09:04+5:30
अभय लांजेवार उमरेड : गावातीलच एका तरुणाशी लग्नाच्या रेशीमगाठी जुळल्या. अशातच अपघातात तरुणाला अपंगत्व आले. जातपंचायतीसमोर प्रकरण पुढे आले. ...
अभय लांजेवार
उमरेड : गावातीलच एका तरुणाशी लग्नाच्या रेशीमगाठी जुळल्या. अशातच अपघातात तरुणाला अपंगत्व आले. जातपंचायतीसमोर प्रकरण पुढे आले. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्न तुटले. दोन्ही कुटुंबांवर दंड ठोठावला. तरुणीने दंड भरण्यास नकार दिला. ‘तुझे लग्न दुसऱ्याशी कसे होते ते आम्ही बघून घेऊ, दुसऱ्याशी लग्न ठरल्यास तुझ्या लग्नाची किंमत एक लाख रुपये मोजावी लागेल’ असा फतवाच जातपंचायतीने काढल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भिवापूर तालुक्यातील मांडवा येथील मायलेकींच्या पोलीस तक्रारीत ही बाब उजेडात आली असून, जातपंचायतीच्या निर्णयांमुळे अनेकांना अन्याय-अत्याचाराचा सामना आजही करावा लागत आहे. उमरेड पोलीस या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देतील काय, असा सवाल जनमानसात विचारला जात आहे.
उमरेडपासून १५ किलोमीटर अंतरावर मांडवा आणि मांडवा (टोला) अशी दोन गावे आहेत. साधारणत: दोन हजार लोकवस्तीच्या या गावात सातवीपर्यंत निवासी शाळा, तर दहावीपर्यंत आणखी एक शाळा आहे. गावातील तरुणाई शिक्षणामुळे उच्च पदावर आपल्या गावाचे नाव मोठे करीत आहेत. दुसरीकडे पिढ्यानपिढ्या ‘त्या’ गावात जातपंचायत भरविणे अद्यापही सुरूच आहे. जातपंचायत म्हणेल ती ‘पूर्व दिशा’ आणि जो दंड आकारला तो दिला तर ठीक, नाहीतर समाजातून ‘बहिष्कृत’ करण्याचा किळसवाणा प्रकार मांडवा आणि लगतच्याच मांडवा (टोला) या गावांमध्ये वर्षानुवर्षे सुरू आहे. याच जातपंचायतीच्या अनेक निर्णयांमुळे काहींना अघोरी आनंद मिळत आहे, तर दुसरीकडे अनेकांना चटके, यातना आणि दु:ख सोसावे लागत आहेत.
मांडवा येथील सुनीता (बदललेले नाव) हिच्या तक्रारीनुसार लग्न तुटल्यानंतर जातपंचायतीने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. एकीकडे दोन वेळच्या भाकरीची चिंता सतावत असतानाच पाच हजार रुपये आणायचे कुठून, असा टाहो सुनीताने जातपंचायतीसमोर फोडला. पाच हजार रुपये देण्यास नकार दिल्याने मागील सात-आठ महिन्यांपासून मायलेकींवर बहिष्कार टाकण्यात आला. सोबतच ‘जर तुझ्यासोबत कुणी लग्न करावयास तयार झाल्यास एक लाख रुपयांचा दंड करू आणि तुझे लग्न कसे होते, ते आम्ही बघून घेऊ’ अशी धमकीच जातपंचायतीने या तरुणीला दिली, अशी संपूर्ण बाब तरुणी आणि तिच्या आईच्या तक्रारीत नमूद आहे. जातपंचायतीने बहिष्कृत केल्याने आम्हास जिव्हारी लागले आहे. आमचे जगणे मुश्किलीचे, असह्य झाले असून आम्हाला न्याय मिळेल काय, असा सवालही सुनीताने उपस्थित केला आहे. उमरेड पोलिसांकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
--
तुम्हालाही जातीबाहेर काढू
कुणाच्याही घरी जाणे-येणे, विवाह सोहळा, समारंभ, मंदिर आदी ठिकाणी आमच्यावर बंधने लादली गेलीत. मावशीच्या मुलीच्या लग्नात गेलो असता आम्हास शिवीगाळ करून बाहेर हाकलले गेले. शिवाय मावशीलासुद्धा ‘यांना तुम्ही येऊ दिले तर तुम्हालासुद्धा जातीबाहेर काढू’ असे धमकावण्यात आल्याची बाबही मांडवा येथील सुनीताने (बदललेले नाव) पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे.
------------------
मांडवा प्रकरणात पुरावे गोळा करणे आणि साक्षीदारांचे बयाण घेणे सुरू आहे. आधी हे काम करावे लागेल, त्यानंतर मग आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाईल.
- राजीव लोले, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, उमरेड