सूतगिरणी कामगाराची मुलगी तालुक्यात प्रथम
By admin | Published: June 14, 2017 03:30 PM2017-06-14T15:30:21+5:302017-06-14T15:30:21+5:30
अस्थायी कामगार म्हणून काम करत असलेल्या नरेंद्र खोब्रागडे यांची मुलगी प्रणाली हिने दहावीच्या परिक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा- समुद्रपूर तालुक्यातील सूतगिरणीत अस्थायी कामगार म्हणून काम करत असलेल्या नरेंद्र खोब्रागडे यांची मुलगी प्रणाली हिने दहावीच्या परिक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असताना व शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसतानाही तिने संपादन केलेल्या या यशाने तिचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे
चंद्रपूर येथून मुलांच्या शिक्षणासाठी समुद्रपुरला स्थायिक झालेल्या नरेंद्र खोब्रागडे यांनी जामच्या सूतगिरणीत अस्थायी कामगार म्हणून काम सुरू केले. त्यांची पत्नी नीता यांनीही एका खासगी इस्पितळात काम धरले. प्रणालीने आईवडिलांच्या या कष्टाचे चीज करीत दहावीत ९३.२० टक्के गुण घेतले. ती येथील विकास विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आईवडील व शिक्षकांना देते. तिला पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायची इच्छा आहे. ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. उषाकिरण थुटे, नगराध्यक्ष शीला सोनारे, नगरसेविका आशा वासनिक, प्राचार्य शशिकांत वैद्य यांनी तिचे अभिनंदन केले आहे.