आधी जावयाला नंतर साळ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:09 AM2021-09-26T04:09:41+5:302021-09-26T04:09:41+5:30
उमरेड : येथील खुनाच्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, जावई आणि साळ्यांनी मिळून ‘गेम’ केल्याचीही बाब ...
उमरेड : येथील खुनाच्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, जावई आणि साळ्यांनी मिळून ‘गेम’ केल्याचीही बाब उजेडात आली आहे. उमरेड येथून १५ किलोमीटर अंतरावरील पेंढराबोडी तलावात शुभम रमेश खंडार (२८, रा. बहिणाबाईनगर, उमरेड) याचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलीस तपासात खुनाचा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी संजय यादव भानारकर (४०, रा. जोगीठाणा पेठ, उमरेड) यास अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता आरोपी संजयचा साळा आशिष प्रमोद डेकाटे (३२, रा. गांगापूर, उमरेड) यास शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. मृत शुभम झोपेत असताना दोन्ही आरोपींनी रॉडने वार केले. त्यानंतर दोघांनीही शुभमला दुचाकीवर मधात बसवीत पेंढराबोडी तलावात नेले. त्या ठिकाणी तलावात फेकून दिले. असा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासात उघडकीस आला आहे. आरोपी आशिषला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. उमरेड पोलीस ठाण्यात ३०२, २०१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.