आधी धडक मारली, नंतर ४ तास ऑटोमध्येच ठेवले, वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:34 AM2023-07-19T11:34:21+5:302023-07-19T11:36:08+5:30

सीसीटीव्हीत घटना उघड, ऑटोच्या क्रमांकावरून चालकाच्या घराचा घेतला शोध

First hit, then kept in auto for 4 hours, old man died | आधी धडक मारली, नंतर ४ तास ऑटोमध्येच ठेवले, वृद्धाचा मृत्यू

आधी धडक मारली, नंतर ४ तास ऑटोमध्येच ठेवले, वृद्धाचा मृत्यू

googlenewsNext

नागपूर : सोमवारीपेठ परिसरात भरधाव ऑटोच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे अपघात झाल्यावर लगेच इस्पितळात दाखल करण्याऐवजी ऑटोचालकाने जखमीला चार तास ऑटोतच ठेवल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

विलास अर्जुनराव वाटकर (६४, रघुजीनगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. १६ जुलै रोजी रात्री नऊ वाजता ते सोमवारीपेठेतील गजाजन महाराज प्रवेशद्वाराजवळून चालत जात असताना एमएच ४९ एआर २८५९ या भरधाव ऑटोने त्यांना धडक दिली. यात वाटकर हे डोक्याच्या भारावर पडले व जखमी झाले. घटनास्थळावरील लोक संतापल्याने ऑटोचालकाने त्यांना ऑटोत टाकले व दवाखान्यात नेतो, असे सांगितले. मात्र, तेथून तो ऑटो घेऊन निघाला व चार तास वाटकर यांना ऑटोतच ठेवले.

दरम्यान, वाटकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. प्रवेशद्वाराजवळ अपघात झाल्याचे कळाल्यावर तेथील सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला. ऑटोच्या क्रमांकावरून ऑटोचालकाच्या घराचा शोध घेण्यात आला. त्यावेळी धक्कादायक बाब समोर आली. ऑटोचालकाने मध्यरात्री १:०० वाजता त्यांना मेयो इस्पितळात सोडल्याचे सांगितले. म्हणजे चार तास वाटकर यांना उपचार मिळालेच नव्हते. नातेवाइक मेयो इस्पितळात गेले असता तेथे वाटकर होते. त्यांना तेथून एका खासगी इस्पितळात व नंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, बेदरकार ऑटोच्या धडकेमुळेच त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही सक्करदरा पोलिस ठाण्यात ताजबागजवळील निवासी असलेल्या ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल न करता आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरधाव ऑटोचालकांची समस्या अनेक काळापासूनची आहे. सक्करदरा चौक, तुकडोजी चौक, सोमवारीपेठ या परिसरात ऑटोचालक भरधाव जातात. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.

जखमीला मेयो इस्पितळाबाहेरच सोडले

वाटकर यांचे वय व त्यांना झालेली जखम पाहता त्यांना त्वरित उपचार मिळणे आवश्यक होते. मात्र, ऑटोचालकाने त्यांना चार तास इस्पितळात नेलेच नाही. त्यानंतर मेयो इस्पितळाच्या दरवाजाजवळ सोडून पळ काढला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ केली.

पोलिसांकडून चुकीची माहिती

दरम्यान, पोलिसांकडून या अपघाताबाबत देण्यात आलेल्या अधिकृत माहितीमध्ये मृत वाटकर यांचे नाव विलासऐवजी विकास नमूद करण्यात आले आहे. याशिवाय ऑटोचा क्रमांक एमएच ४९ एआर २८५९ ऐवजी एमआच ४९ एआर ०८५९ असा नमूद करण्यात आला आहे. पोलिसांकडून ऑटोचालकाला वाचविण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

Web Title: First hit, then kept in auto for 4 hours, old man died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.