आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्हा विभागात प्रथम
By आनंद डेकाटे | Published: September 6, 2024 06:07 PM2024-09-06T18:07:57+5:302024-09-06T18:08:35+5:30
Nagpur : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; प्रधानमंत्री आवास योजना टप्पा एकचे विभागात ९५ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल (९५ टक्के) बांधण्यात आले आहेत. या योजनेच्या टप्पा-२ अंतर्गत विभागातील जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बिदरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याला प्रथम, भंडारा जिल्ह्याला द्वितीय, तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या अंमलबजावणीतही गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. चंद्रपूरला द्वितीय, तर वर्धा जिल्ह्याला तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभघाटे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम.,विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यावेळी उपस्थित होते.
तालुक्यांमध्ये रामटेकची सरस कामगिरी
आवास योजनेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याने सरस कामगिरी केल्यामुळे या श्रेणीतील दोन्ही पुरस्काराने या तालुक्यास सन्मानित करण्यात आले. केंद्र पुरस्कृत योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीने पहिला, गोंदिया पंचायत समितीने दुसरा, तर रामटेक पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकाविला. राज्यपुरस्कृत योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समितीला प्रथम क्रमांकाच्या, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीला दुसऱ्या, तर रामटेक पंचायत समितीला तिसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.