'कोरोना' रुग्णांसाठी भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:12 AM2020-04-03T00:12:40+5:302020-04-03T00:14:38+5:30
छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चे संकट संपूर्ण जगभरात पसरले असताना वैद्यकीय यंत्रणेतील लोक हिमतीने त्याचा सामना करत आहेत. मात्र ‘कोरोना’ रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी नेणे हे जोखमीचे काम आहे. छोट्याशा चुकीमुळे इस्पितळातील अनेकांना ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातील डॉक्टरांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून ‘कोरोना’ रुग्णांसाठी ‘कोवि-सेफ’ ही भारतीय बनावटीची पहिली वाहतूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते ही यंत्रणा ‘मेयो’ इस्पितळाला देण्यात आली.
‘कोरोना’ रुग्णांना रुग्णवाहिकेतून तसेच इस्पितळातदेखील विविध ठिकाणी न्यावे लागते. तपासणीसाठी नेताना एका खाटेहून दुसऱ्या खाटेवर उचलावे लागते. त्यांना नेण्यात येणाऱ्या मार्गावर डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, ड्रायव्हर इत्यादी लोक असतात. त्यामुळे या सर्वांनाच संसर्ग होण्याचा धोका असतो. या परिस्थितीत ‘कोरोना’ रुग्णांना सुरक्षित वाहतूक यंत्रणा कशी उपलब्ध करून दिली जाऊ शकते, या विचारातून ‘ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’तर्फे पुढाकार घेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी अथक प्रयत्नातून आगळीवेगळी वाहतूक यंत्रणा विकसित केली.
या यंत्रणेत रुग्णास एका पारदर्शक बंद उपकरणात ठेवल्या जाते. या उपकरणात प्राणवायूचा पुरवठा सतत सुरू असतो. रुग्णाला काहीही त्रास होणार नाही, अशी ही यंत्रणा आहे. रुग्ण बाहेरच्या लोकांशी बोलू शकतो. ‘व्हेंटिलेटर’ असलेला रुग्णही या यंत्रणेतून सुरक्षितपणे नेता येतो, हे विशेष. डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. परीक्षित महाजन यांची जिद्द, कल्पकता आणि परिश्रम तसेच वैयक्तिक निधी यातून ही यंत्रणा तयार केली आहे. शिवाय डॉ. अमोल कडू यांचेदेखील सहकार्य लाभले.
गुरुवारी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून नितीन गडकरी व डॉ. विकास महात्मे यांच्या हस्ते मेयो इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. केवलिया यांना ही यंत्रणा हस्तांतरित करण्यात आली.