नागपूर ‘एम्स’मध्ये पहिले किडनी ट्रान्सप्लांट
By सुमेध वाघमार | Published: May 9, 2023 06:39 PM2023-05-09T18:39:59+5:302023-05-09T18:40:34+5:30
Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मंगळवारी पहिले किडनी ट्रान्सप्लांट झाले.
सुमेध वाघमारे
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मंगळवारी पहिले किडनी ट्रान्सप्लांट झाले. २२ वर्षीय मुलाला वडिलांनी किडनी दान करून नवे जीवन दिले. गंभीर व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसोबतच आता अवयव प्रत्यारोपणालाही सुरूवात झाल्याने मध्यभारतातील रुग्णांसाठी ‘एम्स’ हे आशेचे केंद्र ठरणार आहे.
राज्यात शासकीय रुग्णालय असलेल्या नागपूर मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१६ मध्ये पहिल्यांदाच मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण सुरू झाले. तेव्हापासून ते फेब्रुवारी २०२०पर्यंत ६८ रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. या सर्व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून झाल्याने गरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला. रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी रुग्णांची गर्दी वाढली. मात्र, मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताच शासनाने प्रत्यारोपणाला पुढे ढकलण्याचा सूचना केल्या.
दरम्यानच्या काळात सोयी अभावी कंटाळून नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुखांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्या जागेवर नेफ्रोलॉजिस्टची नियुक्ती झाली. परंतु सहा महिन्यांवर कालावधी होऊनही प्रत्यारोपणाची प्रतीक्षा कायम आहे. याच दरम्यान आरोग्य विभागाकडून ‘एम्स’ला अवयव प्रत्यारोपणाची मंजूर मिळाली. नेफ्रोलॉजी विभागात उपचार घेत असलेल्या २२ वर्षीय युवकाचा वडिलांनी किडनी दान करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या रक्त व इतरही चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच पुढील प्रक्रियेला वेग आला. अखेर मंगळवारी प्रसिद्ध किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात एम्सच्या डॉक्टरांच्या चमूने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. ‘एम्स’चे संचालक डॉ. एम. हनुमंत राव व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.