पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी
By admin | Published: February 10, 2016 03:21 AM2016-02-10T03:21:14+5:302016-02-10T03:21:14+5:30
राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले किडनी प्रत्यारोपण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडले.
सुपर स्पेशालिटीमध्ये राज्यातील पहिला प्रयोग : आईने दिले मुलीला जीवनदान
नागपूर : राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले किडनी प्रत्यारोपण नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडले. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मदतीने झालेले हे प्रत्यारोपण आर्थिक अडचणीत असलेल्या किडनीच्या रुग्णांना दिलासा देणारे आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्यामुळे राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. नागपुरात २००वर रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे ब्रेन डेड (कॅडेव्हर) घोषित केलेल्या व्यक्तीच्या शरीरातून अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी मोठी आहे, तर दुसरीकडे शासकीय नियमांच्या गुंतागुतींमुळे रुग्णांना अवयवदाते मिळत नव्हते. त्यामुळे कष्टप्रद डायलिसिसचे उपचार करून घेण्याशिवाय या रु ग्णांकडे पर्याय राहिलेला नव्हता. यातच हे प्रत्यारोपण शासकीय रुग्णालयात होत नव्हते. यामुळे त्यावरील खर्च सामान्यांना परडवत नव्हता. २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न समोर आला. त्यावेळी अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याची जबाबदारी घेतली. गेल्या दीड वर्षापासून ते याचा पाठपुरावा करीत होते.
मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण सांगून तब्बल १० महिने प्रत्यारोपण केंद्राची मंजुरी थांबवून ठेवली होती.
साडेतीन तास चालली शस्त्रक्रिया
शहजादी परवीन (४५) रा. सतरंजीपुरा यांची २४ वर्षीय मुलगी गेल्या आठ वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. किडनी निकामी झाल्याने ती डायलिसीसवर होती. तिला जीवनदान देण्यासाठी तिच्या आईने किडनी देण्याचे ठरविले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगळवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. प्रसिद्ध मूत्रपिंड शल्यचिकित्सक डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात सहायक प्राध्यापक डॉ. धनंजय सेलुकर, प्राध्यापक डॉ. समीर चौबे, नेफ्रालॉजीच्या विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, बधिरीकरण विभागाचे प्रमुख डॉ. विजय श्रोत्री, सहायक प्राध्यापक डॉ. मनीष बलवाणी व प्रत्यारोपण समन्वयक मोहिताज शेख आदींच्या सहकार्याने केवळ साडेतीन तासात शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. इतरवेळी हीच शस्त्रक्रिया पाच तासांच्यावर जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.