नागपुरात झाले आधी भूमिपूजन नंतर घेणार जमिनीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:04 AM2018-11-29T10:04:14+5:302018-11-29T10:06:59+5:30
कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे.
कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे. याचे भूमिपूजन १५ जुलै रोजी करण्यात आले. परंतु जमीन मात्र निश्चित झालेली नाही. भूमिपूजनाच्या चार महिन्यानंतर एमआयडीसीने पाच एकर जागा चिन्हित केली. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
या रुग्णालयाची आतापर्यंतची कहाणी आश्चर्यजनक आहे. दोन वर्षांपूर्वी बुटीबोरी येथे मध्य भारतातील कामगारांसाठी अत्याधुनिक रुग्णालयाची संकल्पना पुढे आली. एमआयडीसीकडे जागेची मागणी करण्यात आली. सिएट कंपनीजवळ पाच एकर जमीन देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यानंतर तडकाफडकी रुग्णालयाच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली.
भूमिपूजनाच्यादिवशी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, ही जागा तर महामार्गापासून १५ किलोमीटर दूर आहे. दूरवरून येणाºया कामगारांना रुग्णालयापर्यंत येण्यास त्रास होईल. यासोबतच ईएसआयसीने एमआयडीसीला जमीन घेण्यास नकार देत नवीन जागा देण्यास सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जागा देण्याचे निर्देश दिले. यानंतर जमिनीचा शोध सुरू झाला. साडेतीन महिन्याच्या परिश्रमानंतर एमआयडीसीच्या अधिकाºयांनी आपल्याच कार्यालयाजवळ पाच एकर जमीन शोधली. ईएसआयसीला सूचित करण्यात आले. ईएसआयसीच्या एका उच्चस्तरीय चमूने नागपुरात येऊन बुटीबोरीतील नवीन जागेची पाहणी केली. सूत्रानुसार स्थानिक कार्यालयाने या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. परंतु अंतिम निर्णय समितीची शिफारस आणि मुख्यालयाच्या भूमिकेवरच अवलंबून आहे.
नवीन जागेबाबत सकारात्मक धोरण
ईएसआयसीचे असिस्टंट डायरेक्टर मनोज कुमार यादव यांनी सांगितले की, एमआयडीसीने अगोदर ज्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता, तो खूप दूर होता. रुग्णांना यामुळे त्रास झाला असता. त्यामुळे नवीन जागेची मागणी करण्यात आली. आता एमआयडीसीने आपल्या कार्यालयाजवळच पाच एकर जागा चिन्हित केली आहे. या जागेबाबत कार्यालयाचे धोरण सकारात्मक आहे. परंतु अंतिम निर्णय मात्र मुख्यालयातूनच होईल.
१८० कोटीचा प्रकल्प
ईएसआयसीद्वारे बुटीबोरी येथे प्रस्तावित अत्याधुनिक रुग्णालयाचा प्रकल्प हा १८० कोटीचा आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. मध्य भारतातील कामगारांना आरोग्य सुविधा प्रदान करेल. येथे कॅन्सर रुग्णांसाठी विशेष सुविधा राहतील, असा दावाही केला जात आहे.