अकरावीच्या प्रवेशाची पहिली ‘लिस्ट’ रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 10:38 PM2020-08-29T22:38:13+5:302020-08-29T22:43:05+5:30
केंद्रीय प्रवेश समितीतर्फे घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. दुपारी ३ वाजता समितीच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. ३१ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. दुपारी ३ वाजता समितीच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. ३१ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.
यादी प्रकाशित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे, तर कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनवर यादी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करताना शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्याचे आवाहन केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य सचिव सतीश मेंढे यांनी केले आहे.
प्रवेश निश्चित करताना घ्यावी खबरदारी
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश निश्चित करताना ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’वर क्लिक करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश घ्यायचा नसेल तर क्लिक करू नये. पहिला पसंतीक्रम आला असल्यास विद्यार्थ्याने निवडलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीत संधी मिळणार नाही. प्रवेश रद्द करायचा असेल तर कॉलेजला विनंती करावी. घेतलेला प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.