पहिले लग्न लपवून दुसरे केल्यास दुसरीलाही पोटगी द्यावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:33 PM2018-02-26T12:33:31+5:302018-02-26T12:33:40+5:30
एखाद्या व्यक्तीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केल्यास त्याला दुसऱ्या पत्नीस पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे.
राकेश घानोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या व्यक्तीने पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केल्यास त्याला दुसऱ्या पत्नीस पोटगी द्यावीच लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दिला आहे. या निर्णयामुळे महिलांसोबत बनवाबनवी करणाऱ्या नवरोबांना जोरदार दणका बसला आहे.
पहिले लग्न व पत्नी अस्तित्वात असताना आपण दुसरे लग्न केले. त्यामुळे कायद्यानुसार दुसरे लग्न अवैध ठरत असल्याने दुसरी पत्नी पोटगी मागू शकत नाही, असा दावा एका नवरोबाने केला होता. परंतु, न्यायालयाने त्याला जबाबदारीपासून पळ काढू दिला नाही. संबंधित नवरोबाला त्याचे पहिले लग्न झाले होते हेच सिद्ध करता आले नाही. तसेच, त्याचे पहिले लग्न झाले होते याची माहिती दुसऱ्या पत्नीला होती याचे पुरावेदेखील त्याला सादर करता आले नाही. उच्च न्यायालयाने या बाबी निर्णयात नोंदवून नवरोबाची पोटगीविरुद्धची याचिका फेटाळून लावली. सुरुवातीला जेएमएफसी न्यायालयाने प्रकरणातील दुसºया पत्नीला फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम १२५ अंतर्गत १५०० रुपये पोटगी मंजूर केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे नवरोबाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हा पुरावाही ठरला निष्प्रभ
आपले पहिले लग्न झाले होते हे दुसऱ्या पत्नीच्या वडिलांना माहीत होते याचा एक पुरावा नवरोबाने सादर केला होता. तो पुरावाही निष्प्रभ ठरला. वडिलांना असलेली माहिती मुलीलाही होती असे ठामपणे म्हणता येत नाही. त्यासाठी वडिलांनी ही माहिती मुलीला दिल्याचे व मुलीने ही माहिती वडिलांकडून मिळाल्याचे कबूल करणे आवश्यक आहे. असे बयान कुठेच आलेले नाही या स्पष्टीकरणासह न्यायालयाने नवरोबाचा पुरावा अमान्य केला.