पहिल्या नगरपालिकेत होते २५ पदाधिकारी

By admin | Published: September 14, 2015 03:11 AM2015-09-14T03:11:50+5:302015-09-14T03:11:50+5:30

पहिल्या नगरपालिकेत २५ जणांचा समावेश होता. यात नागपूरचे कमिश्नर, डेप्युटी कमिश्नर, असिस्टंट एक्स्ट्रा असिस्टंट कमिश्नर,...

The first municipality had 25 office bearers | पहिल्या नगरपालिकेत होते २५ पदाधिकारी

पहिल्या नगरपालिकेत होते २५ पदाधिकारी

Next

महापालिकेचा गौरवशाली इतिहास
नागपूर : पहिल्या नगरपालिकेत २५ जणांचा समावेश होता. यात नागपूरचे कमिश्नर, डेप्युटी कमिश्नर, असिस्टंट एक्स्ट्रा असिस्टंट कमिश्नर, सिव्हिल सर्जन, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, स्पेशल असिस्टंट इंजिनिअर आणि डिव्हिजनल सुपरिंटेंडंट आॅफ पोलीस अशा आठ सरकारी अधिकाऱ्यांची पदसिद्ध सदस्य या नात्याने नेमणूक करण्यात आली. नगरपालिका कायद्यानुसार उरलेल्या १७ गैरसरकारी सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. या सदस्यांची निवडणूक शहरातील रहिवाशांतून करण्यात आली. १८८४ साली लॉर्ड रिपनच्या संकल्पानंतर देशातील नगरपालिकांच्या घटनेत बदल करण्यात आला. यात सदस्यांना अधिकार देण्यात आले; सोबतच त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. सरकारी हिताच्या गोष्टी वगळून स्थानिक प्रशासनाच्या इतर सर्व बाबी जनतेवर सोपविण्यात आल्या. त्यांना अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचे अधिकार देण्यात आले. नगरपालिकेच्या रचनेत बदल करण्यात आला. सदस्यसंख्या २५ पर्यंत वाढविण्यात आली. यात २० सदस्य निवडून तर ५ स्वीकृत सदस्यांचा समावेश होता. मतदानाच्या अधिकारात बदल करून संपत्ती व कर हे तत्त्व मान्य करण्यात आले.
दहा चौकात होते फवारे
नागपूर शहराची दीडशे वर्षांपूर्वी भरभराट झाली होती. १८६४ साली शहरातील दहा चौकात फवारे होते. यात संविधान चौक, मेडिकल चौक, गांधीबाग, मेयो हॉस्पिटल चौक, गांधी चौक सदर, लकडगंज चौक, हरिहर मंदिर समोर, कमाल टॉकीज चौक, नवी शुक्रवारी व निकालस मंदिर आदींचा यात समावेश होता. यावर १ लाख २० हजारांचा खर्च करण्यात आला होता.
शहरात पहिला केरोसीन दिवा
दीडशे वर्षांपूर्वी विजेचे दिवे नव्हते. भोसलेंच्या काळात १८६५ साली शहरात पहिला केरोसीन दिवा लावण्यात आला. नंतर रात्रीच्या सुमारास शहरातील महत्त्वाच्या चौकात केरोसीन दिवे लावायला सुरुवात झाली.
रस्त्यांवर सिंचन
१८६७ च्या सुमारास शहरात कच्चे रस्ते होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वर्दळीमुळे धूळ उडत असे. यावर उपाय म्हणून रस्त्यांवर पाणी शिंपले जात होते.
शंभर वर्षापूर्वीचे संत्रा मार्केट
नागपूर शहराला संत्रानगरी म्हणून ओळखले जाते. १९१० मध्ये संत्रा मार्केट सुरू करण्यात आले. त्यावेळी मार्केटमध्ये दररोज पाच ते सहा हजार संत्र्यांच्या बंड्या येत होत्या. पुढे मार्केटचा विकास करण्यात आला.
दारूबंदीचा ठराव
सर्वत्र दारूबंदी करण्यात यावी असा राष्ट्रीय पक्षाचा (काँग्रेसचा)कार्यक्र म होता. यासाठी म्युनिसिपल सदस्यांनी पुढाकार घेतला. १९२० च्या फेब्रुवारी महिन्यात नागपुरात दारूबंदीच्या विरोधात मोठी चळवळ उभी राहिली. यात शाळा -कॉलेजातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. आंदोलनावर १४४ कलमाखाली ब्रिटिश सरकारने बंधने लादली आणि त्यांच्यावर खटला चालविला. आंदोलनात पाच लोकांचा बळी गेला होता.
म्युनिसिपल पोलीस
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच नगरपालिकेकडे संरक्षणाचीही जबाबदारी होती. यासाठी पोलीस यंत्रणा उभारण्यात आली होती. आजही मनपा प्रशासनाला विविध कामासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते. आज मनपाकडे पोलीस पथक नाही. परंतु त्याची गरज आहे.
तलावातून पाणीपुरवठा
नागपूर शहराला अंबाझरी, तेलंगखेडी व गांधीसागर तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली होती. १९१० मध्ये गोरेवाडा प्रकल्प तर १९२९ साली कन्हान प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. आजही गोरेवाडा व कन्हान येथून पाणीपुरवठा होतो.
नासुप्रची स्थापना
१९३७ साली नागपूर सुधार प्रन्यासची स्थापना करण्यात आली. शहरातील नाल्या, नाले विकासाची जबाबदारी नासुप्रकडे आली. तसेच मनपाची मलवाहिन्याची योजना नासुप्रच्या सहभागातून राबविण्यात आली.
मोफत व सक्तीचे शिक्षण
नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनने १९५४ साली ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज हीच योजना कें द्र सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे.
शहरात होते ८ वॉर्ड (डिव्हिजन)
१८६४ ते १८७३ या कालावधीत शहरात ७ वॉर्ड होते. वॉर्ड १ मध्ये शनिचरा बाजार, गणेशपेठ, जौहरीपुरा, वॉर्ड २ मध्ये टिळक मार्गाच्या उत्तरेकडील भाग, वॉर्ड ३ मध्ये देसनापुरा, टिमकी बाजार, चिमणाबाई पेठ, वॉर्ड ४ मध्ये गोसाईपुरा, मस्कामंडी, बाबापेठ, अयाचित मंदिर, वॉर्ड ५ मध्ये कुंभारपुरा, लकडगंज, तेलंगपुरा, सतरंजीपुरा, जुनापुरा व नागोटालीचा बगीचा, वॉर्ड ६ मध्ये बारईपुरा, लालगंज, बस्तरवारी मसानगंज, नयापुरा व गोसावीपुरा, वॉर्ड ७ मध्ये गुलकीपेठ, वकीलपेठ, सिरसपेठ व नवी शुक्रवारी आणि वॉर्ड क्र. ८ मध्ये सीताबर्डी व टाकळीच्या उपनगराचा समावेश होता.
१९४२ मध्ये झाले ४२ वॉर्ड
१९४२ साली शहरात ४२ वॉर्ड तयार करण्यात आले. प्रत्येक वॉर्डातून एक नगरसेवक अशाप्रकारे ४२ सदस्य निवडून दिले जात होते, तसेच ६ सदस्य नामनिर्देशित होते. पुढे ते १९६२ सालापर्यंत कायम होते. त्यावेळी शहरात ३,४१,०४१ मतदार होते. शहरातील लोकसंख्या ४,८९,००० इतकी होती.

Web Title: The first municipality had 25 office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.