प्राणघातक हल्ला झालेल्या व्यक्तीकडून पहिल्यांदाच अवयवदान
By सुमेध वाघमार | Published: March 4, 2023 11:30 PM2023-03-04T23:30:03+5:302023-03-04T23:30:24+5:30
मध्यप्रदेशातील बैतुल येथील गंज एमआयजी हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी दिनेश अग्रवाल (६८) त्या अवयवदात्याचे नाव.
नागपूर : रस्ता अपघातात जखमी किंवा मेंदूत अचानक रक्स्त्राव होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीकडून आतापर्यंत अवयवदान होत होते, परंतु एका प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीकडून शनिवारी पहिल्यांदाच अवयवदान झाले. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. सर्वांच्या प्रयत्नामुळे पाच जणांना नवे जीवन मिळाले.
मध्यप्रदेशातील बैतुल येथील गंज एमआयजी हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी दिनेश अग्रवाल (६८) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी बकुधना, बैतुल या त्यांच्या कामाचा ठिकाणी एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर नागपूरच्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. चार दिवस शर्थीचा उपचारनंतरही त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या एक टिमने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘मेंदू मृत’ झाल्याची घोषणा केली.
डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाचा सल्ला दिला. त्या दु:खातही आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी मीना, मुलगा सागर, मुलगी शीतल व श्रुती यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक वीणा वाटोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
‘एमएलसी’ प्रकरण असल्याने बैतुल पोलिसांची परवानगी
हे ‘मेडिको लीगल’ (एमएलसी) प्रकरण होते. जिथे गुन्हा नोंदवला होता त्या स्थानिक बैतुल पोलिसांची अवयवदानाला परवानगी हवी होती. ‘झेडटीसीसी’ने यासाठी पुढाकार घेतला. बºयाच प्रयत्नानंतर पोलिसांची लेखी परवानगी मिळाली. याची माहिती नागपूरच्या लकडगंज पोलिस स्टेशनला देखील देण्यात आली होती.
५२ वर्षीय पुरुषाला दिले यकृत
न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाला यकृत दान करण्यात आले. एक किडनी याच हॉस्पिटलमधील ३०वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरी किडनी एस.एस. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ६८ वर्षीय महिलेला दान करण्यात आली. दोन्ही बुबूळ महात्मे आय बॅँकेला दान करण्यात आले.