पहिल्याच पेपरला १२ कॉपी सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 08:53 PM2019-03-01T20:53:15+5:302019-03-01T20:54:07+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नागपूर विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रावर १० कॉपी सापडल्या तर गडचिरोली जिल्ह्यात २ केंद्रावर कॉपी झाल्याची नोंद विभागीय मंडळाकडे झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नागपूर विभागीय मंडळाच्या भरारी पथकाकडून १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील तीन केंद्रावर १० कॉपी सापडल्या तर गडचिरोली जिल्ह्यात २ केंद्रावर कॉपी झाल्याची नोंद विभागीय मंडळाकडे झाली.
नागपूर विभागातून यावर्षी दहावीच्या परीक्षेत १ लाख ७२ हजार विद्यार्थ्यांनी ६९० केंद्रावरून परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नागपूर विभागीय मंडळातर्फे परीक्षेसाठी जवळपास ४५ भरारी पथके तैनात आहेत. यात मंडळाचे स्वत:च्या १० पथकाचा समावेश आहे. मंडळाच्या पथकाने भंडारा जिल्ह्यातील आदर्श विद्यालय, सिहोरा येथून दोन विद्यार्थी, ग्रामविकास विद्यालय हरदोली, जि. भंडारा येथून सात विद्यार्थी व जि.प. हायस्कूल एकोडीकिनी येथून एका विद्यार्थ्याला कॉपी करताना प्रत्यक्ष पकडले. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातूनही दोन केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याची माहिती आहे.
दरम्यान बोर्डाकडे काही केंद्रावर कॉपी होत आहे, सामूहिक कॉपी सुरू आहे, असे कॉल आले आहे. तसेच काहींचे निवेदन सुद्धा प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक पेपरला बोर्डाचे भरारी पथक आलेल्या तक्रारींची दखल घेऊन, केंद्राला भेटी देणार असल्याचे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले.