आधी मोबदला द्यावा, नंतर काम सुरू करावे
By admin | Published: March 24, 2017 02:42 AM2017-03-24T02:42:48+5:302017-03-24T02:42:48+5:30
रामटेक लोकसभा मतदारसंघात वेकोलिच्या कोळसा खाणीची संख्या अधिक आहे. वेकोलि प्रशासन जागा अधिग्रहित ....
कृपाल तुमाने : वेकिलोसंदर्भात लोकसभेत प्रश्न
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात वेकोलिच्या कोळसा खाणीची संख्या अधिक आहे. वेकोलि प्रशासन जागा अधिग्रहित करतेवेळी शेतकऱ्यांशी करार करून नुकसानभरपाई व नोकरी देण्याचे आश्वासन दिले जाते. वास्तवात, आधी खाणीचे काम सुरू केले जाते आणि संबंधितांना नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना करार करतेवेळी नुकसान भरपाई द्यावी सोबतच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी लोकसभेत केली.
या संदर्भात खा. तुमाने यांनी सांगितले की, कोळसाा खाणीसाठी वेकोलि प्रशासन करार करून शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहित करते. त्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासोबतच प्रकल्पग्रस्तांना किंवा त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना करारानुसार नुकसानभरपाई मिळायला पाहिजे. वास्तवात, खाणीचे काम सुरू केल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. प्रकल्पग्रस्तांना नोकरी देतेवेळी केवळ कामगारपदी नियुक्त केले जाते. खरं तर त्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन वेकोलिने नोकरी द्यायला हवी. काही प्रकल्पग्रस्त किंवा त्यांच्या पाल्यांना पाच ते सहा वर्षांनंतर नोकरी दिली जाते.
या काळात अनेकांचे नोकरीचे वय निघून जात असल्याने त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागते, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. रामटेक मतदारसंघातील सिंगोरी येथे कोळसा खाण सुरू करण्यात आली. या प्रकल्पग्रस्तांना ना तर नुकसान भरपाई देण्यात आली, ना ही त्यांना नोकरी देण्यात आली.
कंत्राटदाराने काम सुरू केल्याने कंत्राटदार व शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. (जिल्हा प्रतिनिधी)