पहिल्या टप्प्यात मेट्रोचे दहा स्टेशन
By admin | Published: July 28, 2016 02:39 AM2016-07-28T02:39:00+5:302016-07-28T02:39:00+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील दहा मेट्रो स्टेशनचे बांधकाम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता
पुढील आठवड्यापासून बांधकामाला सुरुवात : कॉनकोर साइडिंगजवळ पहिले गर्डर
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील दहा मेट्रो स्टेशनचे बांधकाम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. चे प्रबंध संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केली.
मटेरियल टेस्टिंगसाठी जागतिक दर्जाची लॅब स्थापन करण्यासाठी बुधवारी एनएमआरसीएल व ब्युरो वेरिटास, फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना दीक्षित यांनी सांगितले की, आयएल अॅण्ड एफएस इंजिनियरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, हैदराबादला सर्वच १० स्टेशनचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करायचे आहे. यासाठी त्यांना ५३२.६७ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. ही कंपनी काँग्रेसनगर ते खापरी दरम्यान सात एलिव्हेटेड व तीन एट ग्रेड (जमिनीवरील) मेट्रो स्टेशन उभारेल. मेट्रो रेल्वे प्र्रकल्पांतर्गत १६ जुलै रोजी पहिल्या गर्डरचे लॉचिंग करण्यात आले.
२५ मीटर लांब व ५५ टन वजनाच्या काँक्रिटपासून तयार केलेले गर्डर मजबूत क्रेनच्या साहाय्याने उभारण्यात आले. याला नवीन विमानतळ व खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मिहानमध्ये प्रस्तावित कॉनकोर साइडिंगच्या वरती लाँच करण्यात आले.
या प्रकारचे ८१ गर्डर्स वर्धा रोडवरील कास्टिंग यार्डमध्ये तयार झाले आहेत. त्यांना लवकरच स्थापित केले जाईल. यामुळे ट्रॅक लिंकिंगचे काम सुरू होईल.
विमानतळ ते सीताबर्डी दरम्यान एलिव्हेटेड मेट्रो सेक्शनमध्ये सेग्मेंटल बॉक्स गर्डर्सचा उपयोग केला जाईल. या भागाचे काम जामठा कास्टिंग यार्डमध्ये केले जात आहे. १८ सेगमेंट तयार झाले आहेत. त्यांना लवकरच वर्धा रोडवर खापरीच्या टोकाकडील पिलरवर स्थापित केले जाईल.(प्रतिनिधी)
एनएमआरसीएल-ब्युरो वेरिटासमध्ये एमओयू
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात मटेरियल टेस्टिंगसाठी जागतिक दर्जाची लॅब स्थापन करण्यासाठी बुधवारी एनएमआरसीएल व ब्युरो वेरिटास, फ्रान्स यांच्यात सामंजस्य करार झाला.उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स येथील येथील मेट्रो कार्यालयात एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर एनएमआरसीएलचे प्रकल्प संचालक महेश कुमार अग्रवाल व ब्युरो वेरिटास इंडिया लि. (फ्रान्स) चे संचालक डायरेक्टर उमेश जाधव यांनी स्वाक्षरी केली. ही लॅब वर्धा रोडवरील मुख्य प्रकल्प व्यवस्थापक कार्यालयाजवळ दोन तीन महिन्यात सुरू केली जाईल. या लॅबमध्ये काँक्रिट कन्स्ट्रक्शन सोबतच सिव्हिल वर्क्ससाठी मटेरियलची तपासणी केली जाईल. या लॅबचा फायदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागालाही होईल. या वेळी एनएमआरसीएल चे कार्यकारी संचालक एस. रामनाथ, रोलिंग स्टॉक डायरेक्टर सुनील माथुर, ब्युरो वेरिटासचे प्रॉडक्ट मॅनेजर डॉ. नागेंद्र, रुशीत पडालिया उपस्थित होते.