पहिल्याच पावसात दाणादाण : मनपाची पोलखोल

By admin | Published: June 25, 2015 02:57 AM2015-06-25T02:57:17+5:302015-06-25T02:57:17+5:30

महिनाभरापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी कौतुक केले.

The first rain in the rain: the polling of the municipality | पहिल्याच पावसात दाणादाण : मनपाची पोलखोल

पहिल्याच पावसात दाणादाण : मनपाची पोलखोल

Next

रस्त्यांचे तीनतेरा
नागपूर: महिनाभरापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी कौतुक केले. परंतु चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नागपुरातील रस्त्यांची पोल खोलली आहे. महिनाभरापूर्वी दुरुस्ती झालेल्या शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. स्वच्छ,पारदर्शी व दर्जेदार कामाचा पदाधिकारी व अधिकारी दावा करीत असताना उपराजधानीतील लोकांना पुन्हा या खड्ड्यांंचा त्रास सहन करावा लागणार आहे.
पावसाळ्यात रस्त्यांची कामे बंद असल्याने नागरिकांना पुढील काही महिने जीवघेणे खड्डे रोज सहन करावे लागणार आहे. यामुळे पाठीचे, मणक्यांचे आजार हवे असतील तर नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यावरुन दुचाकीने दिवसातून एकदा तरी या खड्ड्यातून चक्कर मारावी, अशा शब्दात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोट्यवधीचे रस्ते बनविण्यात मोठा रस असतो. मात्र पहिला पाऊस आला क रस्त्यांची अवस्था जैसे थे होते. महिनाभरापूर्वी डांबरीकणर केलेल्या बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नागरिकांची ओरड सुरू आहे. महापालिका प्रशासनाकडे याला उत्तर नाही. पावसाने काही दिवस उघाड दिल्यानंतर दोन- चार खड्डे बुजवून खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू असल्याचा देखावा निर्माण केला जाईल.
लोकमत चमूने बुधवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तेव्हा काही अपवाद वगळता बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत.केलेले डांबरीकरण एका पावसाने कसे उखळते, या कामांमध्ये भ्रष्टाचार तर झाला नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सिव्हिल लाईनसारख्या आकाशवाणी चौकात पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या जागेवर खड्डा आहे. हिस्लॉप कॉलेच्या बाजुच्या मार्गाचे उन्हाळ्यात दुरुस्ती करण्यात आली होती. पहिल्याच पावसात या मार्गावरील गिट्टी उखडली आहे.
मानेवाडा रिंगरोड, वर्धा मार्गावरील खरे टी पॉर्इंंट, रहाटे कॉलनी चौक, सीए रोड, वर्धमाननगर, मोक्षधाम चौक, ग्रेटनागरोडवरील गिट्टी बाहेर आली आहे. काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे. आशिर्वाद चौकात मोठा खड्डा आहे. गणेशपेठ भागातील मॉडेल मील रोडवर मोठा खड्डा आहे. गंगाबाईघाट समोरील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. कळमना भागातील भरतनगर मार्गावर व जगनाडे चौकात पावसामुळे रस्त्यांचा काही भाग वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले आहेत. शास्त्रीनगर, वर्धमाननगरातील मुख्यमार्गावर खड्डे पडले आहेत.
व्हेरायटी चौकातून यशवंत स्टेडियम कडे जाणाऱ्या रस्त्यावर, गणेशनगर बस स्थानकासमोर, वंजारीनगरकडून अजनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहेत. अजनी पोलिस स्टेशनसमोरील मार्गाची उन्हाळ्यात दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु या मार्गावर खड्डे आहेत. तुकडोजी पुतळा चौकातून क्रीडा चौकमार्गे महालकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. लोकमत चौकाकडून दीक्षाभूकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे आहेत. मोक्षधाम ते एसटी बसस्थानक या दरम्यानच्या मार्गाची अवस्था बिकट आहे.
काचीपुरा चौक रामदासपेठ, विद्यापीठ वाचनालय चौक, इमामवाडा चौक ते सरदार पटेल चौक, माटे चौक ते हिंगणा टी पॉईंट, झिंगाबाई टाकळी प्रवेश द्वार ते पांडुरंग मंगल कार्यालय, अहबाब कॉलनी चौक ते रिंग रोड, गिट्टीखदान ते गोरेवाडा, काटोल रोड चौक ते गिट्टीखदान पोलीस ठाणे या दरम्यानच्या रस्त्यांवरही खड्डे वा गिट्टी उखडल्याचे आढळून आले. नवीन सुभेदार ले-आऊटमध्ये गजानन विद्यालयासमोरील वळणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मेडिकल चौकादरम्यानच्या रस्त्यावर तर खड्डेच खड्डे आहेत.
हुडकेश्वर ते म्हाळगीनगर चौकापर्यंत रस्त्याचे काही महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आता या रस्त्यावरील डांबर उखडले आहे. रिंग रोडवर दिघोरी ते छत्रपती चौकापर्यंतच्या रस्त्याच्या काही भागाची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The first rain in the rain: the polling of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.