रुळावरून जाण्याचा पहिला अधिकार रेल्वेचा : सोमेश कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:32 AM2019-06-08T00:32:59+5:302019-06-08T00:33:38+5:30
रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला अधिकारी रेल्वेचा आहे. परंतु नागरिक रेल्वे रुळावर काळजी घेत नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. नागरिकांनी रेल्वेगेट ओलांडताना काळजी घेऊन अपघात टाळावेत, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे रुळावरून जाण्याचा पहिला अधिकारी रेल्वेचा आहे. परंतु नागरिक रेल्वे रुळावर काळजी घेत नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. नागरिकांनी रेल्वेगेट ओलांडताना काळजी घेऊन अपघात टाळावेत, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी केले.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात ३ ते ८ जून दरम्यान आंतरराष्ट्रीय रेल्वेगेट जागरुकता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुंजन सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, मुख्य आरोग्य अधीक्षक व्ही. के. आसुदानी उपस्थित होते. यावेळी बोलताना ‘डीआरएम’ सोमेश कुमार म्हणाले, रेल्वेगेटवरील अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. भारतात एकूण २७ हजार रेल्वे गेट आहेत. या गेटवर सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विभागातील २७ रेल्वेगेट बंद करण्यात आले असून या वर्षी २५ गेट बंद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वरिष्ठ विभागीय दक्षता अधिकारी अरविंद दाभाडे यांनी रेल्वेगेटवर घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. सप्ताहात रेल्वेगेटवरून जाणाऱ्या नागरिकांना अपघात टाळण्याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय आमला, बैतुल, परासिया, जुन्नारदेव, वरुड, ग्रामपंचायत आणि इतर ठिकाणी ‘एक सबक’ नाटिका सादर करून जनजागृती करण्यात आली. नाटिकेला ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांच्या हस्ते पाच हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय दक्षता विभागाला १० हजाराचे पारितोषिक देण्यात आले. सप्ताहात रेल्वेगेट, रेल्वेस्थानक, बसस्थानक, शाळा, महाविद्यालय, आरटीओ कार्यालय परिसरात २ हजार कॅलेंडर, पत्रक, स्टीकरचे वितरण करण्यात आले. संचालन एच. एस. रघुवंशी यांनी केले. आभार रविंद्रनाथम चाम यांनी मानले.