पहिला स्मार्ट बाजार पूर्व नागपुरात

By admin | Published: July 1, 2016 03:00 AM2016-07-01T03:00:44+5:302016-07-01T03:00:44+5:30

किराणा बाजाराला लवकरच सुगीचे दिवस येणार आहेत. पूर्व नागपुरात कळमना येथील चिखलीमध्ये स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ...

First Smart Market East Nagpur | पहिला स्मार्ट बाजार पूर्व नागपुरात

पहिला स्मार्ट बाजार पूर्व नागपुरात

Next

कृष्णा खोपडे यांची माहिती : अत्याधुनिक व हायफाय झोन सुविधा
नागपूर : किराणा बाजाराला लवकरच सुगीचे दिवस येणार आहेत. पूर्व नागपुरात कळमना येथील चिखलीमध्ये स्मार्ट सिटीच्या धर्तीवर लवकरच देशातील पहिला स्मार्ट किराणा बाजार बनविण्यात येणार आहे.
आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य अभियंता गुज्जलवार यांच्यासोबत भाजपा महानगर पदाधिकारी, भाजपा व्यापारी आघाडी आणि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. बैठकीनंतर कृष्णा खोपेडे यांनी स्मार्ट बाजारची घोषणा केली.
कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून इतवारीतील छोट्या परिसरात किराणा बाजार सुरू आहे. ग्राहक, स्थानिक व्यापारी आणि अन्य ठिकाणांहून खरेदीसाठी बाजारात खेणाऱ्या व्यापाऱ्यांना पार्किंग, वाहतुकीव्यतिरिक्त मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या ध्यानात ठेवून कळमन्यात नवीन स्मार्ट किराणा बाजार बनविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात अलीकडेच नागपूर इतवारी किराणा मर्चंट्सच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळमना चिखली येथे स्मार्ट किराणा बाजार बनविण्याच्या प्रस्तावाचे निवेदन दिले होते. यावर निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट किराणा बाजार बनविण्याचा आदेश प्रशासनाला दिला आहे.
अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण
खोपडे म्हणाले, लवकरच पूर्व नागपुरात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या स्मार्ट किराणा बाजारात व्यापारी आणि ग्राहकांसाठी सर्व आरामदायक अत्याधुनिक सुविधा आणि हायफाय झोन राहील. या बाजारात बँक, रेस्टॉरंट, अत्याधुनिक पार्किंग, कॉम्प्युटर धर्मकांटा, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बगिचा आणि अनेक सुविधा राहतील. बाजाराच्या उभारणीनंतर व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी सरकारी कामकाजाकरिता एक खिडकी योजना बाजारात बनविण्याची मागणी सरकारकडे करणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची वेळेची बचत होईल, असे खोपडे यांनी सांगितले. या स्मार्ट बाजारात नागपूर इतवारी किराणा मर्चट्स असोसिएशनच्या माध्यमातून दुकानांचे वितरण करण्यात येणार आहे.
बैठकीत भाजपाचे शहर उपाध्यक्ष मेघराज मैनानी, शहर प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, नागपूर नागरिक बँकेचे माजी अध्यक्ष रमेश मंत्री, किराणा व्यावसायिक संजय सूचक, हरीश कृष्णनानी, प्रकाश वाधवानी, शिवप्रताप सिंह, प्रदीप पंजवानी, अशोक वाधवानी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: First Smart Market East Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.