राज्यातील पहिला आणि देशातील दुसरा राईसपार्क गोंदिया जिल्ह्यात- मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 07:02 PM2018-02-16T19:02:18+5:302018-02-16T19:03:03+5:30
मानवासाठी आवश्यक मुलभूत अन्नतत्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणाऱ्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल.
संत चोखोबा नगरी - देशातील धानाच्या विविध जातींच्या वाणावर सखोल संशोधन करून बदलत्या नैसर्गिक वातारणात टिकाव धरून मानवासाठी आवश्यक मुलभूत अन्नतत्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणाऱ्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता परिषद आणि वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित ७ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संत परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
७ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत चोखामेळा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाने या वर्षापासून संत चोखामेळा यांचे नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. आज हा एकावन्न हजार रूपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विदर्भातील सप्त खंजेरी वादक, प्रसिध्द प्रबोधनकार सत्यापाल महाराज यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राईस पार्कच्या माध्यमातून धानाच्या संशोधनाला मोठी प्रेरणा मिळेल. अलिकडेच भंडारा जिल्ह्यात राईस क्लस्टर देण्याचा निर्णय झाला. आता गोंदिया जिल्ह्यात राईस पार्क देण्याचा निर्णय आजच जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच गोंदिया जिल्ह्यातील गोदामांचे प्रश्न लवकरच निकाली काढले जातील. धानाला उचित दाम मिळवून देण्यासाठीही शासन कटीबध्द असल्याचे ते म्हणाले. गोंदिया जिल्ह्यात तब्बल एक लाख शेतकरी रोजगार हमीच्या कामावर मजूरी करीत आहेत. या मजूरांनी स्वतःच्या कमाईतून प्रत्येकी एक रूपया वर्गणी काढून आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना देण्यासाठी एक लाख रूपये माझ्याहाती आताच्या कार्यक्रमात दिले याची माहिती देत ते म्हणाले की, गोंदियासारख्या अतिदूर्गम भागातील शेतकरी अवर्षण, तुडतुडा, अवकाळी पाऊस आणि आता गारपिटीने त्रस्त असला तरीही तो आत्महत्या करीत नाही, कारण त्यांच्यावर संतांचे संस्कार आहेत. गोंदियातील शेतकऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला मदतीचा हात हेच संतांचे कार्य आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वर्ग एकच्या अनेक जमिनी वर्ग दोनच्या दाखवल्यामुळे जमिनीचा मूळ मालक, भुमीस्वामी असूनही त्याला भुमीधारी दाखवल्यामुळे त्याला त्याचा लाभ घेता येत नाही. यासंबंधी शासनाने तात्काळ निर्णय घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधिचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग दोनच्या जमिनी तातडीने वर्ग एक मध्ये वर्गिकृत कराव्य तसेच यासाठी शेतकऱ्यांनी कोणताही अर्ज किंवा खर्च करण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आखिल भारतीय मराठी संत साहित्याचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी संत विचारांच्या प्रचार प्रचार, संशोधन आणि विविध उपक्रमाबाबत केलेल्या मागण्यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल, तसेच शासन यामागण्यांबाबत सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संत चोखामेळा यांच्या मंगळवेढा येथील निर्वाण भुमीची अवस्था बिकट झाली असून तातडीने आजूबाजूची शासकिय जमिन वापरून तेथे संत चोखामेळांचे स्मारक उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयासंबंधी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना विचारले असता ते म्हणाले की, राईस पार्कच्या माध्यमातून धानाच्या विविध जातींवर सखोल संशोधन केले जाईल. बदलत्या ऋतुमानात जोमाने टिकाव धरू शकेल, कोणत्याही नैसर्गिक रोगराई, बदलत्या हवामानाला बळी पडणार नाही आणि मानवी आरोग्याला लाभकारक तसेच भरपूर उत्पादन देऊ शकेल अशा वाणांचे संशोजन, जतन आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य राईस पार्कच्या माध्यमातून केले जाईल. आजवर देशात केवळ कर्नाटकातच असा राईस पार्क आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीला स्टेजवरच मंजूरी दिल्यामुळे देशात दुसरा आणि राज्यात पहिला राईस पार्क मिळण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय येथील जनतेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाते असे ते म्हणाले.
पुढे बोलतांना बडोले म्हणाले की, राईस पार्क ही संकल्पना केवळ संशोधनापुरतीच मर्यादित नाही तर धानापासून विविध पदार्थ, वस्तू निर्माण करून त्याचे मार्केटिंगसुध्दा करण्यात येणार आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा खऱ्या अर्थाने राईस सिटी सोबतच आता राईस पार्क सिटी म्हणून जागतिक पातळीवर उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.