कुलगुरूंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’कडे पहिले पाऊल
By admin | Published: August 21, 2015 03:13 AM2015-08-21T03:13:22+5:302015-08-21T03:13:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणून ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याचे ..
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणून ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. यासंदर्भातच विधीसभा सदस्य डॉ. राजेंद्र काकडे यांच्या प्रस्तावावर शुक्रवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. जर या बैठकीत याला संमत करण्यात आले तर कुलगुरूंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’कडे हे पहिले पाऊल ठरेल.
परीक्षा प्रणाली ही विद्यापीठासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी या परीक्षा पद्धतीमध्ये समूळ बदलाची आवश्यकता असून ‘५०-५०’ परीक्षा प्रणाली लागू करण्याची आवश्यकता असल्याची संकल्पना डॉ. काणे यांनी पदग्रहण केल्यानंतर लगेच मांडली होती. विधीसभेचे सदस्य डॉ.राजेंद्र काकडे यांनीदेखील याच आशयाचा ठराव विधीसभेच्या मागील बैठकीत मांडला होता. या प्रस्तावावर विद्वत परिषदेत चर्चा व्हावी, असे विधीसभेने सुचविले होते. दरम्यान, त्यानंतर विद्यापीठात सत्ताबदल झाला व नेमका हाच प्रस्ताव कुलगुरूंचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. यावर शुक्रवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव डॉ.काकडे यांचा असला तरी कुलगुरूंचादेखील हाच ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असल्याने या प्रस्तावावर सखोल चर्चा होणे अपेक्षित असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.